गुजरातमधील सुरतजवळील बारडोली-उवा महामार्गावर मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आणि जामनेर आगाराच्या बसची समोरासमोर टक्कर झाली. यावेळी एका बसने पेट घेतल्याने दोन्ही बस चालकांसह ७ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर ४० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातातून बचावलेल्या कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. मृत्यू अगदी समोर येऊन उभा राहिला होता, पण एका चालकाच्या संवेदनशील सल्ल्यामुळे ज्योत्स्ना विनोद पाटील, त्यांचे सासरे गणेश पाटील आणि दोन जुळ्या मुलांचे प्राण अक्षरशः थोडक्यात वाचले.
पाटील कुटुंब थोडक्यात बचावलं
ज्योत्स्ना पाटील यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला सांगितल्यानुसार, त्यांचे चुलत काका विनायक पाटील यांचे १ जून रोजी निधन झाले. अंत्यविधीसाठी त्या सुरतहून नवापूर येथे आल्या होत्या. सोमवारी अंत्यसंस्कार पार पडल्यावर मंगळवारी त्या आपली दोन जुळी मुलं आणि सासरे गणेश पाटील यांच्यासोबत परत सुरतला जाण्यासाठी नवापूर बस स्थानकावर पोहोचल्या.
लहान लेकरं आहेत, मागून या
त्यावेळी जामनेर-सुरत ही बस स्थानकात उभी होती. सासरे गणेश पाटील आधीच बसमध्ये चढले होते. मात्र बसमध्ये मोठी गर्दी असल्याने चालकाने लहान मुलांसह प्रवास करणे गैरसोयीचे ठरेल असे सांगितले. “लहान लेकरं सोबत आहेत, या बसमध्ये खूप गर्दी आहे, तुम्हाला त्रास होईल. दुसऱ्या बसने या” असे चालकाने सुचविले. चालकाच्या या शब्दांमुळे ज्योत्स्ना पाटील व त्यांचे कुटुंबीय त्या बसमधून उतरले आणि नंतर गुजरात डेपोच्या नवापूर-सुरत बसमध्ये बसले.
खरं तर, जामनेर-सुरत बस त्यांच्या डोळ्यादेखत आधी निघून गेली आणि काही वेळाने त्यांची बसही सुरतच्या दिशेने रवाना झाली. मात्र पुढील दोन तासांत जे घडले, तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण अनुभव ठरला.
त्याच बसचा भीषण अपघात
बारडोलीजवळ पोहोचल्यावर त्यांच्या बससमोर एक भयानक दृश्य दिसले. ज्या बसमध्ये काही वेळापूर्वी ते बसणार होते, तीच जामनेर-सुरत बस अपघातग्रस्त होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. बसला लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. जखमींना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू होती, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
“ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही तासांपूर्वी आम्ही ज्या बसमध्ये बसणार होतो, तीच बस आमच्या डोळ्यांसमोर जळत होती. माझी मुलं, सासरे आणि मी त्या बसमध्ये असतो तर काय झालं असतं, याचा विचार करुन अंगावर शहारा येतो” असे सांगताना ज्योत्स्ना पाटील भावूक झाल्या.
काळ आला होता पण…
सुरक्षितपणे आपल्या कुटुंबासोबत उभ्या असलेल्या ज्योत्स्ना पाटील यांच्यासाठी हा प्रसंग म्हणजे मृत्यूला चकवा देऊन परत आल्याची जाणीव करुन देणारा ठरला आहे. त्या म्हणाल्या, “परमेश्वर आणि जयगुरुदेवांची कृपा, तसेच त्या चालकाचे काही शब्द आमच्यासाठी जीवनदान ठरले. त्या क्षणी आम्हाला बसमधून उतरवले नसते, तर आज आमची कथा वेगळी असती” असे ज्योत्स्ना पाटील यांनी सांगितले. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!” याची प्रचिती हा अनुभव ऐकणाऱ्यांना आली.
