ठाण्यातून गायब झालेली मुलगी अखेर सापडली, पोलिसांनी तब्बल ९४८ सीसीटीव्ही तपासले, लोकलमुळे कोडं उलगडलं!

दिव्यातून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा ठाणे पोलिसांनी तब्बल ९४८ सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत सुखरूप सुटका केली. तब्बल ६०हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस मित्र आणि दिवा शहरातील नागरिकांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात आली.

दिव्यात कुटुंबियांसह राहणाऱ्या मुलीचे वडील पाच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधून याठिकाणी आले होते. ते भिवंडीत रांगोळीच्या कारखान्यात काम करतात. मुलगी २८ मे रोजी रात्री ८.३० वाजता खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यानंतर परतली नाही. तिचा शोध न लागल्याने वडिलांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे आणि मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तपासाला गती दिली. दिव्यातील विविध इमारती, आजूबाजूचा परिसर पोलिसांच्या पथकाने पिंजून काढला. त्यावेळी एका इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी दिवा आगासन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जाताना दिसली. त्यानंतर ती दिवा स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून २८ मे रोजी रात्री १०.५७ वाजताच्या अंबरनाथ लोकलमध्ये प्रवेश करताना दिसली. पोलिसांच्या पथकाने कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकांत त्यांची पथके पाचारण केली. त्यानंतर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री १२ वाजता मुलगी एका अनोळखी व्यक्तीसोबत अंबरनाथ स्थानकात उतरताना दिसली. त्यानंतर दोघे बदलापूर लोकलमध्ये चढले आणि मध्यरात्री बदलापूर स्थानकात उतरताना दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा माग काढला.

माणुसकीच्या नात्याने सांभाळ केल्याचा दावा
बदलापुरात शोधमोहीम राबवत अनोळखी व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली. पथकाने त्या व्यक्तीचे घर गाठले. त्यावेळी त्याच्याकडे बेपत्ता मुलीसह तीन ते नऊ वयोगटातील चार अल्पवयीन मुले आढळून आली. घरातील इतर तीन मुले त्याची असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने माणुसकीच्या नात्याने मुलीचा सांभाळ केला असून मुलगी कोणत्याही गैरकृत्याला बळी पडू नये म्हणून त्याने तिला घरी आणल्याचे स्पष्ट केले. हा व्यक्ती नवी मुंबई येथील एका कंपनीत काम करतो. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्याच्या एका मुलीवर अत्याचार झाले होते.आपल्या मुलीप्रमाणे या बेपत्ता मुलीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून त्याने तिला घरी आणले आणि तिचे संगोपन केल्याची माहिती परिमंडळ १चे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *