काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वांद्रे पूर्व इथं असणाऱ्या गरीबनगर परिसरातील अवैध बांधकामांवर पालिकेनं पाडकामाची कारवाई केली. या कारवाईमध्ये तिथं असणाऱ्या रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत मशिदीवरही कारवाई करण्यात आली. या प्रसंगी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळाला. याच घटनेच्या काही दिवसांनंतरल दिल्ली पोलिसांनी एक मोठी कापवाई करत पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तचर यंत्रणेचा पाठिंबा असणाऱ्या आणि त्यांच्याच इशाऱ्यावर चालणाऱ्या एका दहशतवादी टोळक्याला जेरबंद केलं. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार वांद्र्यातील कारवाईचा सूड उगवण्यासाठी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांवर भीषण हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. एका नेपाळी नागरिकासह इतर आठ संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर दिल्लीसह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील हल्ल्यांचा कट रचण्याचा आरोप आहे.
