दोनशे वर्षांच्या सरोवराला नवं जीवन मिळणार, वांद्रे तलावाचं पुनरुज्जीवन; पुसणार अस्वच्छता आणि दुर्गंधीची ओळख

वांद्र्याच्या मध्यवर्ती भागात वसलेले, सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास जपणारे स्वामी विवेकानंद सरोवर अर्थात वांद्रे पश्चिमेकडील वांद्रे तलाव सध्या एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकेकाळी सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणारे नागरिक, फुललेली कमळे आणि नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव गेल्या काही वर्षांत मात्र गाळ, कचरा आणि दुर्गंधीमुळे आपली ओळख गमावत चालला होता. आता महापालिकेने हाती घेतलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे या ऐतिहासिक जलाशयाला नवे रूप मिळणार आहे.

दोन मुख्य टप्प्यात काम पूर्ण करणार

साडेसात एकर परिसरात पसरलेल्या या तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम २ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावातील सुमारे ७५० मेट्रिक टन गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. पाऊस वाढल्यास गाळ उपसण्याच्या कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने हे काम पूर्ण पुढील आठ ते १० दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तलावातील पाण्याची पातळी कमी करून गाळ काढल्यानंतर तलावातील सात नैसर्गिक झऱ्यांमधून पुन्हा स्वच्छ पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक परिसंस्था पूर्ववत होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा विश्वास आहे. दुसऱ्या टप्प्यात तलाव परिसर सुशोभित केला जाणार आहे. पदपथ, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, प्रकाशयोजना आणि आकर्षक सार्वजनिक जागा तयार करून तलाव परिसराला पुन्हा एकदा नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ओळख दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *