प्रिय मैत्रिणीच्या निधनाने अतीव दुःख, सुमन कल्याणपूर यांचा अलविदा, उषा मंगेशकर यांना शोक अनावर

‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर’ म्हणत संसाराचे तत्त्वज्ञान उलगडणारा आवाज, ‘असावे घर ते अपुले छान’ म्हणत रम्य घराची स्वप्ने रंगवणारा स्वर, ‘उठा उठा चिऊताई’ सारख्या बालगीतांना गोडवा देणारी गायिका आणि ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा’ म्हणत वीररस जागवणारा कंठ, या सर्व गीतांना अमरत्व देणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वार्धक्याने अंधेरी पश्चिम येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. आज, सोमवारी सकाळी अंधेरी-जुहू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

उषा मंगेशकर यांना शोक अनावर

ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी एक्स सोशल मीडियावरुन सुमन कल्याणपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘माझी प्रिय मैत्रीण आणि सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो; त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या मनापासूनच्या संवेदना व्यक्त करते’ अशा भावना उषा ताईंनी व्यक्त केल्या आहेत. नुकतंच आशा भोसले यांचं निधन झाल्यानंतर ९० वर्षीय उषाताईंनी एकाकी पडल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

लतादीदी-आशाताईंनंतर ‘भावसुमन’ हरपले

दरम्यान, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या पाठोपाठ भावसंगीतातील आणखी एक महत्त्वाचा स्वर हरपल्याची भावना संगीत विश्वातून व्यक्त होत आहे. २८ जानेवारी १९३७ रोजी ढाका येथे जन्मलेल्या सुमन हेमाडी यांचे बालपण संगीताच्या संस्कारांत गेले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. चित्रकलेची विशेष आवड असलेल्या सुमनताईंनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले; मात्र संगीताची ओढ त्यांना अखेर गायकीकडे घेऊन गेली.

अनेक दशकांची कारकीर्द

पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि मास्टर नवरंग यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. १९५३ मध्ये ‘शुक्राची चांदणी’ या मराठी चित्रपटातून आणि त्यानंतर १९५४ मध्ये ‘मंगू’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायनाची कारकीर्द सुरु केली. पुढे हा स्वरप्रवास अनेक दशकांपर्यंत अविरत सुरुच राहिला. त्यांच्या आवाजातील निर्मळ गोडवा आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे श्रोत्यांना अनेकदा लता मंगेशकर यांचाच आवाज ऐकत असल्याचा भास व्हायचा. मात्र या तुलनेच्या पलीकडे जाऊन सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

हिंदी चित्रपटसृष्टीत सुमन कल्याणपूर यांनी मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे यांसारख्या दिग्गजांसोबत अनेक अजरामर गीते गायली. ‘ना तुम हमें जानो’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘दिल एक मंदिर है’ यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *