त्र्यंबकमध्ये थेट दर्शनासाठी व्हीव्हीआयपी भाविकांची एकाचवेळी गर्दी, अडीच हजार दर्शनाचे; तिजोरीत किती रक्कम जमा?

त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळाने २५०० रुपयांची व्हीव्हीआयपी तातडीची दर्शनव्यवस्था सुरू केली. मात्र, पूर्वनियोजनाअभावी शनिवारी आणि रविवारी येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या समोर थेट दर्शनाचा हट्ट धरलेले भाविक आणि त्यात २५०० रुपयांचे तिकीट काढण्याची तयारी असलेले व्हीव्हीआयपी असा एकच गोंधळ सकाळपासून सुरू होता. दुपारच्या सुमारास २५०० रुपयांची देखील रांग लागली. त्यानंतर उत्तर दरवाजाने २०० रुपये दर्शनबारी थांबवून २५०० रुपये देणाऱ्या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत होते.

दिवसात जवळपास १४ लाख रुपये

व्हीव्हीआयपी दर्शनातून देवस्थान ट्रस्टला शनिवारी एकाच दिवसात जवळपास १४ लाख रुपये मिळाले असल्याची चर्चा होती. दिवसभरात ५०० भाविकांना २५०० रुपये घेऊन दर्शन देण्याचे नियोजन आहे. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी किमान हजार भाविक इच्छुक असल्याचे शनिवारी व रविवारी आढळून आले. देवस्थान ट्रस्टला एका दिवसात १४ लाख रुपये मिळत असतील, तर आतापर्यंत हे पैसे कोणाकडे जात होते, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे दर्शनबारीच्या काळ्या बाजाराला चाप बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *