‘पुष्पा’ स्टाईल सीन; सात देश, 196 दिवस अन् 1150 कोटींचा मुद्देमाल; भारतात सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

एकदोन नव्हे तर तब्बल 196 दिवसांचा प्रवास करत 7 देश आणि 23 बंदरं ओलांडून येणाऱ्या एका जहाजाची भारतात येताच कोंडी झाली आणि देशातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश झाला. घटनाक्रम इतका थरारक होता की, अनेकांनाच हे एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटलं. एखाद्या कशाला, ‘पुष्पा’ या अल्लू अर्जुनच्या गाजलेल्या चित्रपटातील दृश्यच काहींना आठवली. अशा या कारवाईदरम्यान नेमकं घडलं काय?

गुजरातमध्ये थरारक कारवाई… 

गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केलेली एक कारवाई आतापर्यंतची अमली पदार्थ विरोधातील सर्वात मोठी कारवाई असून, यामध्ये सागरी मार्गानं तस्करी केले जाणारे कोट्यवधींचे अमली पदार्थ यंत्रणांनी ताब्यात घेतले, ज्याची किंमत तब्बल 1150 कोटी रुपये इतकी सांगण्यात येत आहे. जहाजाच्या इंजिन रुममध्ये हे अमली पदार्थ लपवण्यात आले होते. मुख्य म्हणजे एका मालवाहू जहाजातून ही तस्करी होत असून, जवळपास 196 दिवसांचा प्रवास करून, 7 देश आणि 23 बंदरं ओलांडून जहाज भारतात आलं. मात्र, भारताआधी कुठंही त्याला अडवण्यात आलं नाही.

कुठून सुरू झाला होता प्रवास? 

MV युरोप अशा नावाचं हे जहाज ब्राझीलहून आपल्या प्रवासाला निघालं. इथून अर्जेंटिना, उरुग्वे, पनामा, बहामा, डोमिनिकन रिपब्लिक आणि अमेरिकेपर्यंतचा प्रवास त्यानं सागरी मार्गानं केला आणि तिथून ते भारतातील मुंद्रा बंदराच्या दिशेनं येऊ लागलं. गुजरात ATS मधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सुरक्षा यंत्रणांना या जहाजानं चकवा दिला होता. मात्र भारतातील अधिकाऱ्यांची नजर चुकवणं त्यास शक्य झालं नाही.

जहाजातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मागच्याच वर्षी भारतात आली होती. मात्र, हा तो काळ होता जेव्हा हे पदार्थ Packing च्या टप्प्यात होते. एचटीएसनं तेव्हापासून त्यांना ट्रॅक केलं, काही नोंदींनुसार जहाजाचा पहिला थांबा ब्राझीलचा साओ विंकेटे बंदरात होता, दिवस होता 11 नोव्हेंबर 2025. यानंतर टप्प्याटप्प्यानं ते पुढे येत अमेरिकेपर्यंत पोहोचलं. मुख्य म्हणजे काही बंदरांमध्ये हे जहाज वारंवार थांबल्यानं त्यानं एकूण 40 थांबे घेतल्याची नोंद झाली.

TOI नं वरिष्ठ एसीएस अधिकाऱ्यांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या जहाजाच्या इंजिन रुममध्ये इतक्या जास्त प्रमाणात अमली पदार्थ असतानाच कुठंही यंत्रणांना याची कुणकूणही कशी लागली नाही याचबाबत शंका उपस्थित होते. अखेरच्या टप्प्यात जहाज आशिया खंडाच्या दिशेनं वळलं. 19 मे रोजी ते मुंबईच्या जवाहरलाल नेहरु बंदरामागोमाग 22 मे रोजी पाकिस्तानच्या कासिम बंदरात गेलं आणि तिथून 26 मे रोजी मुंद्रा बंदरात आलं. जिथं ते दोन दिवस थांबलं.

इथं पुढील थरार होता, कारण याच मुंद्रा बंदरात दुसरं जहाज येऊन तिथूनच ड्रग्ज दुसऱ्या जहाजावर जाणार होते. मात्र तटरक्षक दलासह एटीएसनं करडी नजर ठेवत या प्रसंगीच धडक कारवाई केली. तटरक्षक दलाचं पथक जहाजापाशी पोहोचताच जहाजावरील खलाशांनी कोकेननं भरलेल्या पिशव्या समुद्रात टाकल्या. आतापर्यंत हातील लागलेल्या 5 पिशव्यांमध्ये कोकेनची 115 पाकिटं होती. हे कोकेन एका लहान होडीमध्ये उतरवलं जाणार होतं. शिवाय हा संपूर्ण माल भारतात ठेवला जाणार नव्हता तर, भारत फक्त त्याच्या वितरण यादीतील एक थांबा असू शकतो असा अंदाज अधिकाऱ्यांनी लावला. सदर प्रकरणी यंत्रणांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *