सरकारी खजिन्यातील 303 सोन्याच्या विटा निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात सापडल्या; ₹400 कोटींचा मुद्देमाल जप्त

अमेरिकेतली सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या म्हणजेच सीआयएच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. फेडरल एजंट्सला या अधिकाऱ्याच्या घरात 40 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक किंमतीच्या 300 हून अधिक सोन्याच्या विटा लपवून ठेवल्याचं आढळून आलं. ‘कामाशी संबंधित खर्चासाठी’ हे सोनं त्याने सीआयएकडून घेतले होते. मात्र त्याने हे सोनं कधी परत केलं नाही.

सीआयएच्या अंतर्गत चौकशीमध्ये या अधिकाऱ्याने कायद्याचे संभाव्य उल्लंघन केल्याचं निदर्शनास आल्यानंतर आणि हे प्रकरण एफबीआयकडे सोपवण्यात आलं. सीआयएमध्ये ‘टॉप सिक्रेट’ स्तराची सुरक्षा म्हणजेच हाय-लेव्हल क्लिअरन्स असलेल्या डेव्हिड रश असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. या अधिकाऱ्याला 19 मे रोजी अटक करण्यात आल्याचं एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. “सीआयएच्या अंतर्गत चौकशीत कायद्याचे संभाव्य उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर, सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी ही माहिती तपासासाठी एफबीआयकडे सोपवली,” असं या निवेदनात म्हटले आहे.

सोन्याच्या विटा आणि पैसे

न्यायालयातील कागदपत्रांच्या संदर्भातून दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर ते मार्च दरम्यान, रश याने एजन्सीकडे निधीसाठी अनेक विनंत्या केल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि कोट्यवधी डॉलर्सच्या सोन्याच्या विटांचा समावेश होता. कामाशी संबंधित कारणांसाठी याची गरज असल्याचा दावा त्याने केला होता.

घरात सापडल्या 303 सोन्याच्या विटा

जेव्हा सीआयएने सोने आणि चलनं ज्या ठिकाणी ठेवलं जातं तिथे झडती घेतली असता त्यांना तिथे सोनं आणि पैसेही सापडले नाही. एफबीआयच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, 18 मे रोजी एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी रशच्या घराची झडती घेतली. यावेळी प्रत्येकी सुमारे एक किलोग्राम वजनाच्या अंदाजे 303 सोन्याच्या विटा सापडल्या. या सोन्याची एकूण अंदाजित मूल्य 40 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त होते. अधिकाऱ्यांनी जवळपास 2 दशलक्ष डॉलर्सचे अमेरिकन चलन आणि 35 आलिशान घड्याळे जप्त केली. या घड्याळांमधील बहुतांश घड्याळं ही रोलेक्स कंपनीची आहेत. भारतीय चलनानुसार या सोन्याची किंमत 381 कोटी 93 लाख रुपये इतकी होते. इतर सर्व रक्कम आणि ऐवज याचा विचार केल्यास या व्यक्तीकडे जवळपास 400 कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज सापडला आहे.

एकमेव आरोप

रशविरोधात सार्वजनिक पैशाच्या गुन्हेगारी चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, आतापर्यंत दाखल केलेला एकमेव औपचारिक आरोप त्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल फुगवून सांगण्याबरोबरच हजारो डॉलर्स किमतीचा लष्करी रजेचा पगार फसवणुकीने गोळा करण्याशी संबंधित आहे.

या अधिकाऱ्याबद्दलच्या पाच गोष्टी

1) रश सीआयएमध्ये एका वरिष्ठ कार्यकारी-स्तरावरील पदावर होता आणि त्याच्याकडे अत्यंत सिक्रेट हाय-लेव्हल क्लिअरन्स होती.

2) 2009 साली अखेर रशची सीआयएमध्ये निवड होण्यापूर्वी त्याने अमेरिकी सरकारमध्ये नोकरीसाठी तीन वेळा अर्ज केला होता. त्याच्या अर्जात, त्याने क्लेमसन युनिव्हर्सिटी आणि रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पदव्या घेतल्याचं नमूद केलेलं. तसेच अमेरिकी नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमधून प्रमाणपत्र मिळवल्याचा दावा केला होता आणि तो नौदलाचा पायलट व एअर फोर्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रबंध मार्गदर्शक असल्याचे म्हटले होते.

3) रशच्या कागदपत्रांची पडताळणी झाली असता ती बनावट आढळून आली. अहवालानुसार, तपासकर्त्यांच्या मते, त्याने दोन्ही विद्यापीठांमधून कधीच पदवी मिळवली नव्हती, त्याच्याकडे एफएएकडून मिळालेला कोणताही पायलट परवाना नव्हता आणि त्याला नौदलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्याने दावा केल्याप्रमाणे तो सेवेत नव्हता आणि लष्करी रजेचा पगार फसवणुकीने मिळवण्यासाठी त्याने हे केले होते.

4) रशने जवळपास दोन दशके आपल्या कंपनीला स्वत:च्या पार्श्वभूमीबद्दल खोटे माहिती दिली, असे म्हटले जाते. त्याची खोटी कागदपत्रे सरकारी पार्श्वभूमी तपासणीच्या अनेक फेऱ्या आणि सततच्या छाननीतून पास झाली होती.

5) 18 मे रोजी जेव्हा एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या व्हर्जिनियामधील घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांना 40 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या 303 सोन्याच्या विटा, सुमारे 2 दशलक्ष डॉलर्स रोख रक्कम आणि 35 आलिशान घड्याळे सापडली. त्यापैकी बहुतेक रोलेक्स होती आणि ती सर्व कथितरित्या ‘कामाशी संबंधित खर्च’ या नावाखाली सीआयएमधून चोरलेली होती.

6) रशने स्वत:कडे ठेवलेलं सरकारच्या मालकीचं हे सोनं आणि इतर ऐवज सीआयएने ताब्यात घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *