केरळप्रवेशाची अजून प्रतीक्षाच, अंदमानात दाखल होऊनही मान्सूनचा पुढचा प्रवास रखडला; मुंबईकरांची होरपळ

नैर्ऋत्य मौसमी वाऱ्यांनी बुधवारी अरबी समुद्रात तसेच अंदमानच्या समुद्रात आणखी प्रगती केली असली, तरी भारतीय हवामान विभागाने केरळमधील मान्सूनच्या प्रवेशाबाबत भाष्य केलेले नाही. केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत तरी दाखल होणार का, की ‘एल निनो’ अद्याप सक्रिय नसतानाही भारतीय मान्सूनला त्याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे, अशी विचारणा होत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होऊन पुढे महाराष्ट्रापर्यंत पोहोचेपर्यंत आणखी काही दिवस तरी सध्याची होरपळ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गुरुवारी कसं असेल हवामान?

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आज, गुरुवारीही उष्ण आणि दमट वातावरणाचा फटका बसू शकतो. सध्या उत्तर आणि वायव्य दिशेकडून वारे येत असल्याने मुंबई तसेच महामुंबई परिसरात उष्णतेचा कहर जाणवत आहे. मुंबईमध्ये बुधवारीही कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक नोंदले गेले. कुलाबा येथे ०.८ तर सांताक्रूझ येथे १.१ अंशांनी कमाल तापमान सरासरीहून अधिक होते. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी, राम मंदिर येथे कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक होता. राम मंदिर येथे ३८.७, भायखळा येथे ३७.८, विक्रोळी येथे ३६, विद्याविहार येथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक नोंदवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *