नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर, सरकारकडून कोणते आदेश देण्यात आले?

आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील इबोलासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची, तसेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत या रुग्णांची देखरेख करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

राज्यातील आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, विमानतळ तसेच इतर यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधण्यात येत आहे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, विशेष रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळांमधील सुविधा, अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय उपचारांच्या सुविधेची उपलब्धता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांमध्ये या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळावरील यंत्रणेचा आरोग्ययंत्रणेशी समन्वय आहे, तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील सर्वेक्षण विभागाकडूनही यासंदर्भातील माहिती देण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. इबोला हा प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक स्त्राव, उलटी किंवा दूषित वस्तूंशी थेट संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सामान्य परिस्थितीत हवेतून पसरत नाही. तसेच कोविड-१९इतका सहज संसर्गजन्य नाही, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे. मानक संसर्ग नियंत्रण पद्धतींचे पालन करणे, योग्य हात स्वच्छता राखणे, सार्वत्रिक प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे, तसेच अनावश्यक भीती टाळून व्यावसायिक तयारी ठेवण्याचे आवाहन निवासी डॉक्टरांना करण्यात आले आहे.

देशात इबोलाचा उद्रेक किंवा समुदायस्तरावर या आजाराचा प्रसार नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे महापालिकेच्या ‘मार्ड’ने स्पष्ट केले आहे. करोनासंसर्गामध्ये महापालिकेच्या निवासी डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिशय धडाडीने काम केले होते. त्यामुळे भविष्यात अशी गरज भासल्यास सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना प्रतिबंधात्मक तयारी, सर्वेक्षण उपक्रम, संसर्ग नियंत्रण उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *