पाच दशकांहून जुन्या भिवंडी एसटी स्थानकाची अखेर पुनर्बांधणी; इमारत, फलाटांचा विकास, हजारो प्रवाशांना फायदा

भिवंडी एसटी स्थानकाच्या पुनर्बाधणीसाठी गृह विभागाने १४ कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. एसटीच्या ठाणे विभागात असलेल्या भिवंडी बस स्थानकातून रोज २५०हून अधिक बस फेऱ्या होतात. या स्थानकामधून लांब पल्ल्याच्या तसेच स्थानिक मार्गावरील बस धावतात. अन्य आगारांतील एसटी गाड्यांची ये-जा असल्याने या स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी दिसून येते. या स्थानकात फलाट, वाहतूक नियंत्रक कक्ष, स्थानक प्रमुख, आरक्षण कक्ष, पार्सल कार्यालय, चालक-वाहक विश्रांतीगृह, पोलिस कक्ष, प्रसाधनगृह आदी विकासाच्या कामांसाठी १४ कोटी १८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. सोमवारी काही अटींच्या अधीन राहून या अंदाजपत्रकास गृह विभागाने मान्यता दिली.

अटींमध्ये प्रामुख्याने या कामासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांची तांत्रिक मान्यता घेणे, जुने बांधकाम तोडणे आदी बांधकामपूर्व बाबींचा खर्च अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेल्या खर्चातून करणे, आदींचा समावेश आहे.

काय-काय बदलणार?

  • बस स्थानकाची इमारत ८ कोटी ५४ लाख
  • पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था ४२ लाख ७० हजार
  • विद्युत व्यवस्था ९३ लाख ९४ हजार
  • अग्निशमन यंत्रणा १२ लाख २० हजार
  • रेनवॉटर हार्वेस्टिंग तीन लाख
  • कुंपण, प्रवेशद्वार ८ लाख ८० हजार
  • काँक्रीटीकरण ९४ लाख ४० हजार

 

पाच दशकांहून जूनी इमारत

गेली अनेक महिने भिवंडी येथील एसटी डेपोची स्थिती गंभीर झाली होती. हजारो कर्मचारी दररोज या डेपोमधून प्रवास करत. एसटी डेपोमध्ये वापरत असलेली इमारतीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वीच धोकादायक घोषित केलं होतं. तरीही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याबद्दल काही करत नव्हतं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवासाठी धोका निर्माण झाला होता. पण आता पुनर्बांधणीनंतर ही परिस्थिती बदलणार आहे.

भिवंडी एसटी डेपोचं उद्घाटन 20 मार्च, 1972मध्ये करण्यात आलं. त्यानंतर 50हून अधिक वर्षांपासून नागरिक या डेपोमधून प्रवास करत आहे. ही इमारत त्यावेळी बांधण्यात आली होती. गेली पाच दशकं या इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्यामुळे ती जीर्ण झाली. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, शहापूर, वाडासारख्या अनेक शहरं आणि ग्रमीण भागांसाठी या डेपोमधून बस सुटतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *