दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील ‘यास्मीन टॉवर’ या २३ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर ड्रग्जची प्रयोगशाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या इमारतीमधील फ्लॅटमध्ये छापा टाकून एका बांगलादेशी महिलेसह तिघांना अटक केली आहे.
शोएब मन्सुरी (३१), सुफियान मन्सुरी (२८) आणि मामुनी सरकार (२७) अशी आरोपींची नावे आहेत. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करून बाजारात विक्री केली जात होती. या फ्लॅटमधून ५१ कोटी रुपयांचा कच्चा माल, एमडी ड्रग्ज तसेच पिस्तुल आणि १९ काडतुसांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. फ्लॅटच्या स्वयंपाकगृहामध्ये प्रयोगशाळेप्रमाणे युनिट उभारून एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे आढळले.
मली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे, सहायक निरीक्षक उल्हास खोलम यांचे पथक ड्रग्जविरोधी कारवाई करीत असताना त्यांना आग्रीपाडा येथे एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी जगदाळे यांच्या पथकाने ‘यास्मीन टॉवर’मध्ये छापा टाकला. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल तसेच इतर पदार्थ सापडले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोएब याच्यासह त्याची मैत्रीण मामुनी आणि सुफियान यांना पोलिसांनी अटक केली.
ड्रग्जसाठी भाड्याने घर
शोएब आणि त्याचे साथीदार हे दक्षिण मुंबईतील नळ बाजार तसेच परिसरातील आहेत. ड्रग्ज तयार करण्यासाठी त्यांनी खास भाड्याने फ्लॅट घेतला होता. सुमारे ४५ हजार रुपये दर महिना भाडे दिले जात होते. फ्लॅट मालकाने याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात दिली होती का, याबाबतची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
