मुंबई-दुबई हवाई मार्गावर सर्वाधिक प्रवासी; पहिल्या तिमाहीत UAE ठरला भारतीयांचा सर्वांत पसंतीचा देश

भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळ हे प्रमुख केंद्र ठरत असल्याचे यंदाच्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अहवालातून स्पष्ट झाले आहे. या कालावधीत मुंबई-दुबई आणि दुबई-मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या देशातील इतर आंतरराष्ट्रीय मार्गांच्या तुलनेत सर्वाधिक नोंदवली गेली. तसेच, युनायटेड अरब अमिरात (यूएई) हा भारतीय प्रवाशांचा सर्वाधिक पसंतीचा देश ठरला आहे.

अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत यूएईमधून भारतात २४ लाख ८५ हजार १९२ प्रवासी दाखल झाले, तर भारतातून २५ लाख १९ हजार ४७८ प्रवासी यूएईला रवाना झाले. या वाहतुकीत मुंबई विमानतळाचा मोठा वाटा असून, दुबईहून मुंबईत २ लाख ५५ हजार ३९८ प्रवासी आले, तर मुंबईहून दुबईला २ लाख ५७ हजार ४५१ प्रवाशांनी प्रवास केला.

नोकरी, व्यापार आणि खरेदीसाठी मध्य आशियाई देशांकडे भारतीयांचा ओढा कायम असल्याचे या आकडेवारीवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. मध्य आशियातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर काही भारतीय तात्पुरते मायदेशी परतले होते. मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा परदेश गाठल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतही यूएईहून भारतात २६ लाखांहून अधिक प्रवासी आले होते, तर २९ लाखांहून अधिक प्रवासी भारतातून यूएईला गेले होते. थायलंड, सिंगापूर आणि सौदी अरेबिया या देशांमधून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय असली, तरी ती १० लाखांच्या आत राहिली.

हाँगकाँगहून भारतात सर्वाधिक मालवाहतूक
आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत हाँगकाँगचा भारताकडे होणाऱ्या आयातीत पहिला क्रमांक राहिला. पहिल्या तिमाहीत हाँगकाँगमधून भारतात ३१ हजार टनांहून अधिक मालवाहतूक झाली. त्यानंतर युनायटेड किंगडम, जर्मनी आणि यूएई या देशांचा क्रमांक लागतो. तर, भारतातून परदेशात जाणाऱ्या मालवाहतुकीत यूएई अव्वल ठरले असून, या कालावधीत भारतातून यूएईला ५९ हजार टन माल पाठविण्यात आला.

यूएईनंतर युके आणि जर्मनीकडे मोठ्या प्रमाणात निर्यात मालवाहतूक झाली. येमेन, तुर्कमेनिस्तान आणि युगांडा या देशांतून भारतात या तिमाहीत शून्य टन मालवाहतूक झाली. अझरबैजान, बेलारूस, भूतान आणि किरगिझस्तान येथून अत्यल्प प्रमाणात माल भारतात आला. तसेच, भारतातून कंबोडियाला कोणतीही मालवाहतूक झाली नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *