आठ महिन्यांनंतर पुन्हा धावणार ‘मोनोरेल’; या आठवड्यात अंतिम चाचणी, कधी सुरू होणार सेवा?

तांत्रिक बिघाड, अपघात, वारंवार होणारा सेवेचा खोळंबा आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे तब्बल आठ महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मुंबईची मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर २०२५पासून बंद असलेल्या मोनोरेलच्या अंतिम सुरक्षा तपासण्या आणि चाचणी फेऱ्या या आठवड्यात सुरू होत असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास जूनमध्ये सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

चाचणी फेऱ्यांना सुरुवात

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिपत्याखालील महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल)कडून मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी अंतिम सुरक्षा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल यांच्या देखरेखीखाली ही तपासणी सुरू असून पुढील काही दिवस चाचणी फेऱ्या घेऊन सर्व तांत्रिक पडताळणी केली जाणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बघेल यांनी सुचवलेल्या सर्व सुरक्षाविषयक मुद्द्यांची पडताळणी केली जात आहे. आठवडाभर सुरू राहणाऱ्या या तपासणीनंतर निरीक्षणे नोंदवून आवश्यक अटींसह मंजुरी दिली जाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जूनमध्ये प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सखोल पाहणी

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ‘ब्युरो व्हेरिटास इंडिया’ने १९.५४ किमी लांबीच्या संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल)-चेंबूर मोनोरेल मार्गाला प्रमाणपत्र दिले होते. मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या गंभीर तांत्रिक घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबई मोनोरेलच्या इतिहासात प्रथमच निवृत्त सुरक्षा आयुक्तांकडून स्वतंत्र तपासणी केली जात आहे. या तपासणीत मोनोरेलच्या गाड्या, सिग्नल यंत्रणा, दूरसंचार व्यवस्था आणि स्वयंचलित तिकीट प्रणालीचीही सखोल पाहणी होणार आहे.

सन २०१४मध्ये मोठ्या अपेक्षांसह सुरू झालेल्या मोनोरेलला सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. २०२५च्या पावसाळ्यात वारंवार सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वडाळा डेपोबाहेर चाचणीदरम्यान नवीन मोनोरेल रेक रुळावरून घसरल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. बंद होण्यापूर्वी दररोज सुमारे १८ ते २० हजार प्रवासी मोनोरेलचा वापर करत होते.

मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल), भायखळा, चिंचपोकळी, वडाळा, अँटॉप हिल, जीटीबी नगर, चेंबूर आणि टिळकनगर परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *