‘नवतपा’च्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पारा 47 अंशापार; रस्त्यांवर शुकशुकाट, 9 दिवस पारा चढण्यामागचं कारण काय?

वाढत्या उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. घराबाहेर पडले तर उष्म्याने असह्य होतं. घरात एसी किंवा कुलरशिवाय नकोसं वाटतं. मान्सूनपूर्वी हा ताप आणखी वाढला आहे. देशभरात ‘ नवतपा ‘ सुरू झाला असून पुढील काही दिवस हा उष्मा कायम राहणार आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीत तापमानात सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद होते. यंदा 25 मेपासून नवतपा सुरू झाला असून येत्या 2 जूनपर्यंत ‘नवतपा’चा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

‘नवतपा’ म्हणजे काय?

पंचांगानुसार, सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या काळाला नवतपा असं म्हटलं जातं. ‘नव’ म्हणजे नऊ आणि ‘तपा’ म्हणजे उष्णता. राजस्थानच्या लोककथांमधून ही संकल्पना प्रसिद्ध झाली असली तरी या प्रक्रियेला नैसर्गिक कारणं सुद्धा आहेत. एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान पृथ्वीवरील जमीन अनेक आठवडे प्रखर सूर्यप्रकाश शोषून घेत असते. त्यामुळे जमीन तापलेली असते. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी राहून मग उष्ण आणि कोरडे वारे वाहण्यास सुरुवात होते. यामुळे तापमान वाढायला सुरू होऊन उष्णतेच्या तीव्र लाटा येतात.मान्सूनपूर्वी सरींच्या आगमनापूर्वी नऊ दिवस हे वातावरण कायम राहते. भारतातील उत्तर आणि मध्य भागांतील राज्यांमध्ये ‘नवतपा’चा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. या काळात तापमान 45 अंशाच्या पुढे पोहोचते आणि उष्णतेच्या लाटांचा धोका निर्माण होतो. हे नऊ दिवस संपूर्ण आकाश निरभ्र राहते. याच कारणामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर पोहोचतात. त्यात उष्ण वारे वाहू लागते. या कारणांमुळे तापमान वाढून उष्माघाताचा धोका निर्माण होतो.

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक परिणाम?

पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये दिवसा तीव्र उष्ण वारे वाहणार असून रात्री काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या कालावधी अनेक राज्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारपर्यंत रस्ते डोळ्यांसमोर तरंगू लागले आहेच तर पायाखाली भट्टी झाल्याचा अनुभव येत आहे. त्यात एल निनोच्या प्रभावामुळे नागरिकांना लवकर दिलासा मिळेल याची शक्यता कमी वाटते आहे.

नवतपा ला 25 मेपासून सुरूवात झाली आहे. सोमवारी, उत्तर प्रदेशातील बांदा आणि महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथे तापमान 47.6 अंश सेल्सिअसवर नोंदलं गेलं होतं. पुढील काही दिवस या परिसरांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून 29 मे नंतरच काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात दुपारी 11 ते 5 दरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *