हवामानातील सततचे बदल आणि अमेरिका – इराणमधील युद्धाचा फटका कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यांना बसला आहे. आणखी आठवडाभरच आंबा बाजारात राहणार आहे. पण कोकणातील हापूस आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने बागायतदार अडचणीत आलंय. काही दिवसांपूर्वी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जाणारा हापूस आता अवघ्या १५ रुपयांवर आल्याने शेतकरी हतबल झालंय. या भयानक दरवाढीमुळे आंबा बागायतदार पुरते संकटात सापडले असून, त्यांना साधा वाहतुकीचा खर्च काढणेही कठीण झाले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की,खर्चही निघत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर आंबे फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी संगनमत करून हे दर पाडल्याचा थेट आरोप आता संतप्त शेतकऱ्यांकडून केला जातोय.
