पुणेकरांच्या नाइटलाइफला पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे ब्रेक, अघोषित ‘कर्फ्यू’चा निर्णय, नवे नियम काय?

मध्यरात्री दुचाकी- कारमधून शहरात फिरल्यावर गरमागरम पोहे, वडे, चहाचा आस्वाद घेऊन मित्र-मैत्रिणींसमवेत गप्पांचे फड रंगविणाऱ्या पुणेकरांच्या ‘नाइटलाइफ’ला पुणे पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे ‘ब्रेक’ लागणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे रात्री व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटात मात्र गोळा आला आहे.

खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या बेकायदा खाऊगल्ल्या, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या- ठेले रात्री दहा वाजल्यानंतर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. रात्री उशिरा रस्त्यांवर होणारी वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाऱ्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनधिकृत ‘नाइटलाइफ’ला अघोषित ‘कर्फ्यू’ लावण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. परवानाधारक रेस्तराँ-हॉटेल, पब आणि बार मात्र नियमांच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास पोलिसांनी मुभा दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *