गवार 120 तर फरसबी 200 रुपये किलो! तापमान, इंधन दरवाढीमुळे भाजीपाला महागला, सामान्यांच्या खिशाला फोडणी

 मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थितीचा फटका हा संपूर्ण देशाला बसला आहे. ग्रामीण भागात इंधनाचा तुटवडा असल्याने अनेक इंधन पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. दुसरीकडे इंधनाचे दर सुद्धा वाढत आहेत. यासर्वांचा फटका शेतमालाच्या वाहतूक खर्चावर बसला असून परिणामी भाजीपाला महागला आहे. दररोजच्या जेवणातील भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतोय.

उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान वाढत आहे. परिणामी, घाऊक बाजारातील वाढलेले दर किरकोळ बाजारात अधिकच चढ्या भावाने ग्राहकांना मोजावे लागत आहेत. तसेच इंधन दरवाढीने याला अधिकच फटका बसलाय. आठवडाभरात फरसबी, घेवडा, कारली, ढोबळी मिरची, काकडी आणि पालेभाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात ८० ते १२० रुपये किलो असलेली फरसबी किरकोळ बाजारात १६० ते २०० रुपयांनी विकली जात आहे. गवार १०० ते १२०, घेवडा १२० ते १४०, तर वाटाणा १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. भेंडी, दोडका, शेवगा शेंग आणि दुधी भोपळ्याचे दरही वाढले आहेत.

किरकोळ व घाऊक बाजारातील दर : 

फरसबी :
घाऊक दर : ८० ते १२०
किरकोळ दर : १६० ते २००

गवार :
घाऊक दर : ३० ते ४०
किरकोळ दर : १०० ते १२०

घेवडा :
घाऊक दर : ७० ते ८०
किरकोळ दर : १२० ते १४०

वाटाणा :
घाऊक दर : ६५ ते ७५
किरकोळ दर : १०० ते १२०

शेवगा शेंग :
घाऊक दर : ३० ते ४०
किरकोळ दर : ८० ते १००

भेंडी :
घाऊक दर : २६ ते ४०
किरकोळ दर : ८० ते १००

दुधी भोपळा :
घाऊक दर :  २० ते ३०
किरकोळ दर : ६० ते ८०

कारली :
घाऊक दर : २० ते ४४
किरकोळ दर : ६० ते ८०

ढोबळी मिर्ची :
घाऊक दर : २४ ते ३६
किरकोळ दर : ६० ते ८०

दोडका :
घाऊक दर : ३० ते ४०
किरकोळ दर : ८० ते १००

टोमॅटो :
घाऊक दर : १४ ते २४
किरकोळ दर : ४० ते ५०

वांगी :
घाऊक दर : १६ ते ४०
किरकोळ दर : ६० ते ८०

पाऊस पडेपर्यंत दर कायम राहण्याची शक्यता : 

याचवेळी टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आणि वांग्याचे दर तुलनेने नियंत्रणात असले, तरी बाजारातील बहुतांश भाज्या महागल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पावसाळा सुरू होईपर्यंत भाजीपाल्याच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालेभाज्यांनीही ग्राहकांचे बजेट विस्कटले आहे. शेपूची जुडी ४० रुपये, पालक ३० ते ४० रुपये, मेथी ३० रुपये, तर कोथिंबीर ३० ते ४० रुपयांनी विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *