२८३ इमारती धोकादायक! उल्हासनगरमधील स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष करणाऱ्या १४४ इमारतींना नोटीस

पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या ताज्या अहवालाने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शहरातील तब्बल २८३ इमारती धोकादायक, तर सहा इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, १४४ इमारतींकडे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालच नसल्याचे उघड झाल्याने हजारो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या इमारतींना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

इमारती कोसळून अपघात

उल्हासनगर शहरात दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती कोसळून होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता, महापालिकेकडून यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अहवालानुसार, प्रभाग समिती क्रमांक १मध्ये ८४, प्रभाग समिती क्रमांक २मध्ये सर्वाधिक ९९, प्रभाग समिती क्रमांक ३मध्ये ६३, तर प्रभाग समिती क्रमांक ४मध्ये ३७ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली आहे. या इमारतींपैकी सहा इमारती राहण्यास पूर्णपणे अयोग्य घोषित करण्यात आल्या आहेत. तसेच, ३४ इमारती रिकाम्या करून संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय २२७इमारतींना तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असून, १६ इमारती किरकोळ दुरुस्तीच्या श्रेणीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *