डोक्यावर हंड्याचे इमले, घोटभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी तडफड; महाराष्ट्रातील पाणीटंचाईचं विदारक चित्र

चिखलदरा तालुक्यातील दुर्गम खडीमल गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांचे हाल वाढले आहेत. टँकर गावात दाखल होताच विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे. घोटभर पाण्यासाठी जीवघेणी तडफड होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विशेषत: महिलांना घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत तासन्‌तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित

मेळघाटातील घनदाट जंगल परिसरात वसलेल्या खडीमल गावाची लोकसंख्या सुमारे १२०० ते १५०० दरम्यान आहे. चिखलदरा मुख्यालयापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरील हे गाव अत्यंत दुर्गम मानले जाते. मात्र, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही गावाची पाणीटंचाई कायम असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाने विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या. मात्र, त्या केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे तात्पुरती उपाययोजना केली जाते; मात्र कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती कायम आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने खडीमल गावासाठी कायमस्वरूपी जलयोजना राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे

देशपातळीवर दखल तरी व्यथा कायम

खडीमलच्या पाणीप्रश्नाची दखल विविध स्तरांवर घेतली गेली, देशपातळीवरही या गावाची व्यथा पोहोचली; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आदिवासी बांधवांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ती प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

टँकरसमोर महिलांची झुंबड

खडीमलच्या पाणीप्रश्नाची दखल विविध स्तरांवर घेतली गेली, देशपातळीवरही या गावाची व्यथा पोहोचली; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आदिवासी बांधवांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ती प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *