म्हाडातर्फे जाहीर 2640 घरांच्या सोडतीसाठी आजतागायत 84,782 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक घरासाठी जवळपास 32 जणांनी अर्ज केला आहे. त्यापैकी 59,069 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीतील सहभाग निश्चित केला आहे. इच्छुक नागरिकांना आता 29 मे रोजी रात्री 11:59 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.
घरांच्या किमतीत कपात
विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील सदनिकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीतील बांधकाम चालू असलेल्या सदनिका या गटामध्ये कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक 538 व 539 मधील 1221 घरांच्या विक्री किमतीत 7.5 टक्के कपात केली आहे. अत्यल्प गटामध्ये ₹29 लाखांपासून घरं उपलब्ध आहेत. ही घरं मानखुर्दसारख्या भागात उपलब्ध असून सर्वाधिक किंमत असलेली म्हणजेच उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत ₹6.82 कोटींपर्यंत असून ही घरं ताडदेव, अँटॉप हिलसारख्या भागांमध्ये आहेत.
कुठे कुठे उपलब्ध आहेत घरं?
कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोप घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा येथे घरे आहेत.
कुठल्या गटासाठी किती सदनिका?
अत्यल्प (₹6 लाखांपर्यंत कौटुंबिक) उत्पन्न असलेल्या गटासाठी – 145
अल्प (₹6 ते ₹9 लाखांपर्यंत कौटुंबिक) उत्पन्न असलेल्या गटासाठी – 858
मध्यम (₹9 ते ₹12 लाखांपर्यंत कौटुंबिक) उत्पन्न असलेल्या गटासाठी – 798
उच्च उत्पन्न गटासाठी (₹12+ लाख कौटुंबिक) उत्पन्न असलेल्या गटासाठी – 839
कुठे करता येणार अर्ज?
म्हाडाच्या housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाइन नोंदणी व अर्ज करता येतो. अनामत रक्कमही इथूनच भरण्याची सोय उपलब्ध आहे. अनामत रक्कम भरल्यानंतरच सोडतीतील सहभाग निश्चित होतो. या सोडतीमध्ये एससी, एसटी, एनडी, डीटी, व्हिजी, दिव्यांग, विधवा, पूर्वसैनिक इत्यादींसाठी वेगळे आरक्षण लागू आहे.
म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असून, कोकण मंडळाच्या अनेक प्रकल्पांत पायाभूत सेवासुविधाही नाहीत. परिणामी कोकण मंडळाच्या लॉटरीलाही कमी प्रतिसाद आल्याचे चित्र पूर्वीपासून आहे. मात्र आता किमान कोकण मंडळाच्या लॉटरीदरम्यान हे चित्र बदलावे म्हणून ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच जयस्वाल यांनी कोकण मंडळाच्या प्रकल्पांची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान जयस्वाल यांनी भविष्यात सोडतीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या सदनिकांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीमधील तपशील समोर आला नसला तरी घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्यात असाव्यात यासाठी पडद्यामागे जोरदार हलचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
