मुंबईत खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत आगीचे आणि धुळीचे मोठमोठे लोळ बघायला मिळत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून आग किती भीषण होती याची प्रचिती येत आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती अद्याप अधिकृतपणे समजू शकलेली नाही. पण जास्त तापमानामुळे बसच्या तापमानात वाढ झाली आणि त्यातून तिला आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाशीत मुंबईहून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर आग लागल्याची घटना घडली आहे. वाशीच्या ब्रिजवर ही घटना घडली आहे. उन्हामुळे बसचे तापमान वाढले आणि त्यामुळे ही आग लागल्याची चर्चा आहे. पण याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलीस तपासातून याबाबत सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न
आगीच्या घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या पथकाने शर्थीने प्रयत्न करत आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांना यश देखील आलं. आग विझवल्यानंतर जवानांनी कुलिंगचे काम केले. यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. पण घटनेत बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. बस या दुर्घटनेत जळून खाक झाली आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ
दरम्यान, बसला आग लागल्याची घटना घडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. अनेकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. यावेळी रस्ताने जाणाऱ्या इतर प्रवाशांनी थांबून पोलीस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली. तर काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये घटनेचे फोटो आणि व्हिडीओ घेतले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेच्या व्हिडीओमध्ये नागरिकांमध्ये कशाप्रकारे भीती निर्माण झाली होती ते त्यांच्यातील संभाषणातून जाणवत आहे. अर्थात घटनादेखील तितकीच भीषण होती.
