नवीन नागपूरसाठी भूसंपादन सुरू; शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप, ७८ एकर जमीन प्राप्त

 नागपूरच्या विकासाला बळ देणाऱ्या नवीन नागपूरच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून आतापर्यंत १९ रजिस्ट्री करण्यात आल्या. ७८ एकर जमीन प्राप्त झाली असून शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असे एनएमआरडीएकडून सांगण्यात आले.

हिंगणा तालुक्यातील मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगाव (रिठी) या गावांत नवीन नागपूर वसविले जात आहे. नवीन नागपूरसाठी ६९२ हेक्टर आर जागा संपादित करायची आहे. यापैकी १२ हेक्टर जमीन शासनाचीच असल्याने त्याचा प्रश्नच नाही. मात्र उर्वरित जमीन मिळावी यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले. गोधनी गावातील १९ लाभार्थ्यांना मोबदला देण्यात आला.

आज, सोमवारपासून येथील लाडगाव शेतकऱ्यांची रजिस्ट्री करण्यात येणार आहे, असे एनएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी प्रियदर्शनी बोरकर यांनी सांगितले. नागपूरच्या
विकासात मोलाची भर टाकणाऱ्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन बोरकर यांनी केले. नवीन नागपूर प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूकदरांना परवानगी घेणे सोपे व्हावे यासाठी एक खिडकी योजना (सिंगल विंडो क्लिअरन्ससाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म) सुरू होणार असल्याने नवीन नागपूरच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही एनएमआरडीएने व्यक्त केला.

गुंतवणुकीसाठी उद्योजकांकडून विचारणा

पुढील १५ वर्षांत तीन टप्प्यात नवे नागपूर विकसित करण्याचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठीचा एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. नवीन नागपूर आणि रिंगरोडसाठी हुडकोकडून ७ हजार ८०० कोटी रुपये कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने हमी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे बघीतले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाने ६ हजार ५०० कोटींच्या नवीन नागपूर प्रकल्पाला ३ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. नवीन नागपूरचा प्रकल्प स्टार्ट अप्स, सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग, आयटी कंपन्या, व्यावसायिक कार्यालयांसाठी केंद्र, मिश्र वापर विकासावर भर देणारा राहणार आहे. आता गुंतवणुकीसाठी चार उद्योजकांकडून विचारणा झाली असल्याचे एनएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *