कोकणवासी दुहेरी कोंडीत! Mumbai-Goa Highwayवर 12 पुलांचं काम रखडलं, 12 तासांचा प्रवास, टोलवसुलीची मात्र घाई

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडापाठोपाठ खांब येथेही टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना महामार्गावरील प्रवाशांचा वाहतूककोंडीचा जाच रविवारी आणखी वाढला. रायगडमधील माणगाव-इंदापूर आणि रत्नागिरीतील संगमेश्वर परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवासी, पर्यटकांचे हाल झाले. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोलवसुली सुरू असल्याने प्रवाशांच्या संतापात वाहतूककोंडीने भर टाकली.

माणगव-इंदापूर बायपासचं काम रखडलं

मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गिकांवर रविवारी वाहतूककोंडी होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव- इंदापूर परिसरात वाहतूककोंडीचे चित्र रविवारी भीषण बनले होते. रविवारी सकाळपासूनच वाहतूककोंडी सुरू झाली. तिथे काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे पुलाच्या एका खांबामुळे माणगाव-इंदापूरच्या बायपासचे काम अद्यापही रखडले आहे. यामुळे तिथे नेहमी होणारी वाहतूककोंडी रविवारी आणखी वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे हाल झाले. संगमेश्वर येथील शास्त्रीपुलाजवळही वाहतूककोंडी झाली. यामुळे प्रवासी, पर्यटकांना मोठा मनस्ताप झाल्याचे सिंधुदुर्ग येथील मंदार मराठे यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गावर टोल सुरू करण्यात आला असला तरी वाहतूककोंडीमुळे प्रवासासाठी लागणारा वेळ कमी झालेला नाही. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासासाठी लागणारा दहा ते बारा तासांचा वेळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे महामार्गावर टोल सुरू करण्यामागचा उद्देश व इतकी घाई कशासाठी, असा संतप्त प्रश्न पर्यटक, प्रवासी करीत आहेत.

टोलनाक्यांना विरोध

रायगड जिल्ह्यातील खारपाडा व खांब या टोलनाक्यांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील हातिवले व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ओसरगाव हे टोलनाके सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र, या टोलनाक्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी विरोध केला आहे. ‘महामार्गाचे काम अपूर्ण आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर ते हातखंबा या टप्प्यात महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गावरील तब्बल बारा पुलांचे काम अद्यापही सुरू आहे. ही कामे अपूर्ण असताना टोलचा भुर्दंड अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया माणगाव येथील वाहनचालक अनिकेत कांबळे यांनी दिली.
महामार्गावरील टोलवसुलीविरोधात सामान्य नागरिकांनीही बाह्या सरसावल्या आहेत. सिंधुदुर्ग येथील नागरिक संजय सावंत यांनी लोकप्रतिनिधींना पत्र पाठवले आहे. महामार्गावरील कामे अपूर्ण असताना खारपाडा टोल प्लाझावर सुरू झालेली वसुली हा कोकणवासीयांच्या खिशात हात घालण्याचा प्रकार आहे, असे सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

खारपाडा येथे आज आंदोलन

महामार्गावरील खारपाडा टोलनाका बंद करावा, या मागणीसाठी जनआक्रोश समिती खारपाडा टोल प्लाझावजळ आज, सोमवारी सकाळी १० वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे. ‘हे आंदोलन केवळ एका दिवसापुरते नसून, टोल बंद होईपर्यंत कायम राहणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे आधी महामार्ग पूर्ण करा, त्यानंतरच टोल सुरू करा’, अशी भूमिका जनआक्रोश समितीचे सचिव रुपेश दुर्गे यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *