बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर अत्याचार आणि तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने 18 साक्षीदारांच्या जबाबासह मुबलक पुराव्यांचे दोषारोपपत्र नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दीड हजारांहून जास्त पानांचे हे दोषारोपपत्र असून, उर्वरित आठ गुन्ह्यांबाबत पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होणार आहे.
नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात 26 मार्च रोजी अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरुन दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान या तीन संशयितांविरुद्ध अत्याचारासह धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद आहे. त्यापैकी दानिश व तौसिफ यांना एसआयटीने पुढील 28 मार्चपर्यंत अटक केली होती. तर, पसार असलेल्या निदा खान हिला 7 मे रोजी रात्री छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेण्यात आले. निदाच्या जामीन अर्जावर 25 मे, तर दानिश व तौसिफच्या जामिनाबाबत 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. या गुन्ह्याला 26 मे रोजी 60 दिनस पूर्ण होत असल्याने शुक्रवारी नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
दोषारोपपत्रात काय काय?
संशयित दानिश याने पीडितेवर इगतपुरीच्या एका रिसॉर्टमध्ये अत्याचार केले.
संशयित दानिश याने पीडितेला लोणावळा येथे नेले होते; तेथील पुराव्यांचा समावेश
संशयित दानिश, तौसिफ आणि निदा यांनी पीडितेच्या धर्मांतराचा प्रयत्न केला.
पीडितेच्या घरातून संशयितांच्या धर्मांतील महिलांचा पोशाख, धार्मिक पुस्तके जप्त
संशयित निदा हिने पीडितेला दिलेल्या 171 सोशल मीडियावरील लिंक्स व त्याच्या विश्लेषणाचा समावेश
पॉश सदस्यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नातलगांचे जबाब
संशयितांच्या मोबाइलमधून संकलित पुराव्यांसब प्रत्यक्ष संकलित पुराव्यांचा समावेश
कट रचून धर्मांतराच्या प्रयत्नाचे वाढील कलम
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये देवळाली कॅम्पच्या गुन्ह्यात वाढील कलम
दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि विशेष सरकारी वकील अजय मिसल यांनी नुकताच एसआयटीच्या तपासाचा मागोवा घेतला होता. त्यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक निरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक भाईदास माळी यांच्यासह पथकाने तपासाची संपूर्ण माहिती सादर केली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर निदाच्या जामिनावर सुनावणी होणार असल्याने तिचा जामीन मंजूर होणार का? याकडे राज्यासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे.
