आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारपासून कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे…आधीच घसरलेले कांद्याचे दर, निर्यात ठप्प आणि वाढत्या उष्णतेमुळे कांदा खराब होत असताना आता लिलाव बंदच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
लासलगाव बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र आता सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला पत्र देत लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या निर्णयामागे इंधन तुटवडा हे मुख्य कारण असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहेत. राज्यात आणि परराज्यात डिझेलची कमतरता जाणवत असल्यानं शेतीमाल वाहतुकीसाठी ट्रक मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं कांदा आणि धान्याची खरेदी करून माल बाहेर पाठवणं अशक्य होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
