उल्हासनगरमध्ये थरार! भररस्त्यात 7-8 जणांचा गोळीबार, सख्ख्या भावांचा जागीच गेम; जामिनावरील टोळीचा कारनामा

उल्हासनगरमधील कॅम्प-५ परिसरात गुरुवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या गोळीबाराने शहर हादरले आहे. कैलाश कॉलनी चौकात झालेल्या या थरारक हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा काका गंभीर जखमी झाला आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हल्ल्यात अनिल हरकेश चौहान (२२) आणि अमन हरकेश चौहान (१७) यांचा मृत्यू झाला. तर अर्जुन सुरजबली चौहान (२६) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास कैलाश कॉलनी चौकात अचानक ७ ते ८ जणांचा गट आला आणि त्यांनी गर्दीसमोरच गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी धावाधाव केली. हल्लेखोरांनी उघडपणे रस्त्यावर अनेक गोळ्या झाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

2020 मधील वैमनस्यातून हल्ला?

प्राथमिक तपासात ही घटना २०२० पासून सुरू असलेल्या जुन्या वैमनस्यातून घडल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ गावाशी संबंधित एका कुख्यात गुंडा आणि कैलाश कॉलनी परिसरातील काही रहिवाशांमधील वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *