रविवार 24 मे रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालदुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई लोकलच्या मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या (Central Line) माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर मुख्यत्वे हा ब्लॉक असेल.ब्लॉकच्या काळात अत्यावश्यक काम असेल तरच रेल्वेने प्रवास करा आणि घरातून पडण्यापूर्वी लोकल गाड्यांचे सुधारित वेळापत्रक तपासून घ्या. लोकल फेऱ्या वळवण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात मुलांना सुट्टी असल्यामुळे अनेकदा पालक सुट्टीच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी मेगाब्लॉकची संपूर्ण बातमी वाचूनच बाहेर पडा.
मुंबईच्या मेन लाईनवर माटुंगा मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे त्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील उपनगरी गाड्या विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन मार्गावरील सेवा नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर लाईनवर कसा असेल मेगाब्लॉक?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 पर्यंत सुटणाऱ्या वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
