इराणवर अमेरिका कोणत्याही क्षणी हल्ला करणार? व्हाईट हाऊसमध्ये वेगवान हालचाली, ट्रम्प यांचे सर्व दौरे रद्द, मुलाचं लग्नही टाळलं

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. दोन्ही देशांमधील संवादाचा मार्ग अद्याप पूर्णपणे बंद झालेला नाही. मात्र व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये वेगवान हालचाली घडत असून, यामुळे मोठ्या हल्ल्याची तयारी सुरु असल्याची शंका निर्माण होत आहे.

CBS आणि Axios च्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, CIA संचालक जॉन रॅटक्लिफ आणि चीफ ऑफ स्टाफ सुझी वाइल्स यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टनुसार, अमेरिकन लष्कराने काही जवानांच्या मेमोरिअल डेच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत. तर परदेशात तैनात अमेरिकन लष्कराच्या ठिकाणांसाठी ‘रिकॉल रोस्टर’ अपडेट केलं जात आहे, जेणेकरुन गरज पडल्यास तात्काळ कारवाई केली जाऊ शकेल.

ट्रम्प यांनी आपले सर्व कार्यक्रम केले रद्द, व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले सर्व खासगी कार्यक्रम रद्द केले आहेत. ते जर्सीमधील बेडमिंस्टर गोल्फ क्लबला जाणार होते. मात्र अचानक त्यांनी हा दौरा रद्द केला असून, वॉशिंग्टनला परतले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आपला मुलगा ट्रम्प ज्युनिअरच्या विवाहसोहळ्यातही सहभागी होण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर लिहिलं आहे की, “सरकारी स्थिती आणि अमेरिकेवरील प्रेमाखातर मला व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित राहणं गरजेचं वाटत आहे”.

दुसरीकडे, ट्रम्प यांचे निकटचे सल्लागार डॅन स्कॅव्हिनो यांनी सोशल मीडियावर B-2 स्टिल्थ बॉम्बर्सचा एक व्हिडिओ शेअर केला. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी असा दावा केला की, यापूर्वीही एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता.

इराणबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेतील बदल

Axios च्या रिपोर्टनुसार, ट्रम्प आता नवीन हल्ल्यांचा गांभीर्याने विचार करत आहेत. मंगळवारी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आपण मुत्सद्देगिरीला आणखी एक संधी देऊ इच्छितो, असं सांगितले असले तरी गुरुवार रात्रीपर्यंत मात्र त्यांची भूमिका गांभीर्याची झाली होती.

ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलं की, “इराण करार करण्यासाठी अत्यंत आतुर झाला आहे. आम्ही त्यांना जोरदार तडाखा दिला, आणि आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता; कारण इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत”

दरम्यान, पाकिस्तान आणि कतार हे देशही ‘बॅक-चॅनेल’ डिप्लोमसीमध्ये सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर हे देखील तेहरानमध्ये दाखल झाले आहेत. युद्ध टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या अखेरच्या प्रयत्नांपैकीच एक प्रयत्न म्हणून या चर्चांकडे पाहिले जात आहे. याच दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे भारतात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *