मुंबईत नदी आणि जमिनीखालून धावणार बुलेट ट्रेन; विक्रोळी ते बीकेसी भुयारी मार्ग, खोदकामाला लवकरच सुरुवात

मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी मुंबई शहरातील भुयारी मार्गाच्या खोदकामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. टनेल बोरिंग मशीनचा तब्बल ३५० टन वजनाचा पहिला कटरहेड यशस्वीपणे विक्रोळीतील शाफ्टमध्ये उतरवण्यात आला आहे. ‘टीबीएम’च्या मुख्य शिल्ड जोडणीतील हा अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा आहे. जोडणी पूर्ण झाल्यानंतर भुयाराच्या प्रत्यक्ष खोदकामाला प्रारंभ होईल. देशात प्रथमच एवढ्या मोठ्या क्षमतेच्या ‘टीबीएम’च्या मदतीने रेल्वे बोगद्यासाठी खोदकाम होणार आहे.

घणसोली ते शिळफाटा खोदकाम पूर्ण

बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबईतील २१ किमी भुयारी मार्गासाठी ‘टीबीएम’ आणि ‘एनएटीएम’ (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) यांचा वापर करण्यात येत आहे. ‘एनएटीएम’ने घणसोली ते शिळफाटादरम्यान ४.८ किमीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. विक्रोळी ते वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) बुलेट स्थानकापर्यंतचे खोदकाम ‘टीबीएम’ने पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कटरहेड विक्रोळी शाफ्टमध्ये उतरवण्यात आला आहे.

कटरहेड आणि ‘टीबीएम’ची जोडणी पूर्ण झाल्यावर विक्रोळीच्या ५६ मीटर खोलीवरून बीकेसीपर्यंत ५.८ किमीपर्यंत खोदकाम सुरू करण्यात येईल. ‘बीकेसी’ची खोली रस्ते सपाटीपासून ३६ मीटरपर्यंत असणार आहेत. शहरी भाग आणि मिठी नदीखालून खोदकाम करण्यात येणार आहे. बुलेटच्या भुयाराचे खोदकाम करताना परिसरातील इमारती, रस्ते आणि जमिनीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक देखरेख प्रणाली वापरण्यात येत आहे. यात ‘सरफेस सेटलमेंट पॉइंट्स’ (एसएसपी), ‘ऑप्टिकल डिस्पेल्समेंटर सेंसर’, ‘टिल्ट मीटर’, ‘थ्री डी, टार्गेटेस’, ‘स्ट्रेन गेज’ आणि ‘सिस्मोग्राफ’ अशा उपकरणांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या(एनएचएसआरसीएल) अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘टीबीएम’ने असे होते खोदकाम…

जमिनीखाली बोगदा खणण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे ‘टीबीएम’. ‘टीबीएम’च्या पुढील भागात सतत फिरणारे कटरहेड बसवले जाते. त्यात असलेले ‘कटिंग डिस्क’ खडक व माती कापण्याचे काम करून मार्ग तयार करते. माती-दगड ‘स्क्रेपर्स’च्या मदतीने साफ केले जाते. ‘बकेट लिप्स’च्या मदतीने हा राडारोडा चेंबरमध्ये जमा होतो. पाइपलाइन आणि ‘कन्व्हेयर’ प्रणालीतून राडारोडा बोगद्याबाहेर आणला जातो. एकीकडे हे काम सुरू असताना टीबीएमच्या मागील बाजूने काँक्रीट रिंग बसवून बोगद्याची भिंत तयार केली जाते. त्यामुळे बोगद्याचे खोदकाम आणि काँक्रिटीकरणाचे काम वेगाने आणि सुरक्षितपणे होते. दाट लोकवस्ती असलेल्या शहराखाली तसेच, संवेदनशील परिसरात काम करताना टीबीएम विशेष प्रभावी ठरते.

कटरहेडची वैशिष्ट्ये

१३.६ मीटर व्यास -अप आणि डाउन अशा दोन्ही बुलेट मार्गांसाठी एकाच मोठ्या बोगद्याचे खोदकाम-वजन तब्बल ३५० टन ( जवळपास २५० मध्यम आकाराच्या एसयूव्ही गाड्यांच्या वजनाएवढे)
पाच स्वतंत्र भागांमध्ये विक्रोळी साइट्सवर आणले- एक हजार सहाशे किलो उच्च-प्रिसिजन वेल्डिंगच्या मदतीने जोडणी
युनिटमध्ये ८४ ‘कटिंग डिस्क’, १२४ ‘स्क्रेपर्स’ आणि १६ ‘बकेट लिप्स’चा समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *