मराठी मुलाने सुरु केलेली कॉकरोच जनता पार्टी काय आहे?; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे

देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. अवघ्या 5 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 100 लाख (10M) फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकलं. तर काही तासांत काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचं दिसून येत आहे.

काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय चळवळीसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात, असं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले. यानंतर ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नव्हती, तर बनावट पदव्या असलेल्यांना उद्देशून होती, असं स्पष्टीकरण सूर्यकांत यांनी दिलं. मात्र यादरम्यान, सूर्यकांत यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळाला.

कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली

मूळच्या छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे.

कोण आहेत अभिजीत दीपके? (Who Is Abhijeet Dipke)

30 वर्षीय अभिजीत दीपके मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशी आहे. अभिजित सध्या अमेरिकेतल्या बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. याआधी अभिजीत यांनी आम आदमी पक्षाचे सोशल मीडिया हँडल सांभाळले आहे. आता अभिजीत दीपके कॉकरोच जनता पार्टीचे ‘संस्थापक आणि समन्वयक’ आहेत. सरन्यायाधीश हे फक्त निमित्त होतं. अनेक वर्षं साचलेला राग कुठूनतरी बाहेर येणारच होता. नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. आम्हाला चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *