अशोक खरात प्रकरण, आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणामुळे राज्यभरामध्ये चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमध्ये सासरच्या मंडळींनी लव्ह मॅरेजनंतर नवविवाहितेचा छळ केल्याचं समोर आलं आहे. प्रेमविवाह करुन घरी आलेल्या सुनेची जात वेगळी असल्याचे टोमणे मारत तिचा छळ करण्यात आला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे. सततच्या छळाला आणि जाचाला कंटाळून पीडितेनेच पोलिसांत धाव घेत म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध रितसर तक्रार नोंदवली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा प्रेमविवाह झाला असून लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यापासूनच, “तू आमच्या जातीची नाहीस,” असं म्हणून तिला हिणवण्यास सुरुवात झाली. पीडिता गरोदर असल्याचं समजल्यानंतरही तिच्या सासूकडून तिला छळ सुरुच होता. “तू आमच्या जातीची नाहीस. तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही,” असं म्हणत सासूनेच पीडितेला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. सासरच्या व्यक्तींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असंही पीडितेने म्हटलं आहे. हादरवून टाकणारी बाब म्हणजे या साऱ्या कालावधीत पीडितेचा एकदा, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणण्यात आल्याची नोंद तक्रारीमध्ये आहे. पीडिता आधी पुण्यात नोकरीस होती. मात्र पुण्यातील नोकरी गेल्यानंतर ती तिच्या सासरी राहू लागली. तेव्हापासून म्हणजेच जुलै 2025 पासून तिचा सासरी अधिक छळ होऊ लागला.
तू वेडी आहेस असं सिद्ध करुन…
सासू-सासऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केला जायचा असंही पीडितेने म्हटलं आहे. टोमणे, शिव्यांच्या माध्यमातून माझा मानसिक छळ करण्यात आल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं आहे. “तू वेडी आहेस असं सिद्ध करुन मेंटर हॉस्पिटलमध्ये भरती करु,” अशी धमकीही मला देण्यात आली होती, असं पीडितने पोलिसांना सांगितलं आहे.
सोन्याचे दागिने विकले अन्…
केवळ मानसिक छळच नाही तर पतीने आपले दागिने विकल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. नाशिकमध्ये घर घेण्यासाठी पतीने माझे सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे जमवले. पैशांसाठी आणि हुंड्यांसाठी माझा छळ करण्यात आल्याचा आरोप पाडितेने केला आहे. केवळ जात वेगळी असल्याने मला कायमच मला हिणवण्यात आलं, असं पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे.
तिघांविरोधात तक्रार दाखल
या प्रकरणामध्ये पिडितेच्या तक्रारीनुसार म्हसरुळ पोलिसांनी पीडितेचा पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरत महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात म्हसरुळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
