मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कोडा कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. स्कोडा कार दोन्ही मार्गाच्या मधील लोखंडी दुभाजकाला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, लोखंडी दुभाजकाचा जाड पत्रा तुटून तो कारच्या आरपार गेल्याने या भीषण अपघातात पुण्यातील दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बौर गावच्या हद्दीत झाला आहे.
जयदीप गोडे (वय -६१), किशन उत्तम चंदाने (वय -७५, दोघेही रा. उंडरी, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून, संजय मेवाला (वय-६१, रा. उंडरी, पुणे) हे जखमी झाले आहेत.
वडगाव महामार्गाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप गोडे आणि किशन चंदाने हे त्यांच्या स्कोडा कारने (क्रमांक – एमएच -१२/पीएच -७४२७) मुंबईला काही कामानिमित्त गेले होते. ते मुंबईतील काम उरकून पुन्हा माघारी पुण्याला चालले होते. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगदा सोडल्यानंतर काही अंतरावर भरधाव वेगात जाणाऱ्या स्कोडा कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दोन्ही मार्गा मधील लोखंडी दुभाजकाला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या भीषण धडकेत लोखंडी दुभाजकाचा जाड पत्रा तुटला आणि हा पत्रा कारच्या आरपार गेला.
अपघाताची माहिती मिळताच वडगाव महामार्गाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस उपनिरीक्षक शिंदे व कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांनी सहकाऱ्यांसह तसेच देवदूत आपत्कालीन पथक, डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून युद्धपातळीवर कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. तसंच जखमीला उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांनंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.
