OLX वरुन रुममेट मागवला आणि 37 हजारांचा ऐवज गमावला!

घर भाड्याने देण्यासाठी किंवा जुन्या वस्तू विकण्यासाठी ओएलएक्स किंवा क्वीकरसारख्या वेबसाईटचा सर्रास वापर होतो. पुण्यातील अमित सिंहने देखील रुममेटसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. मात्र ती जाहिरात अमितला चांगलीच महागात पडली. कारण ओएलएक्सच्या माध्यमातून अमितची गाठ रुममेटशी नव्हे तर चोराशी पडली.

कोथरुड परिसरातील परमहंसनगर इथे राहणाऱ्या अमित सिंहला रुममेट हवा होता. म्हणून त्याने 25 सप्टेंबरला ओएलएक्स या वेबसाईटवर जाहिरात दिली. जाहिरात पाहिल्यावर दोनच दिवसात म्हणजे 27 सप्टेंबरला आरोपी गोरखनाथ वाघ उर्फ अर्जुन वाघ त्याच्या घरी राहायला आला. इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला गोरखनाथ मुळातच मोठा चलाख. अमित सिंहचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने चोरीचा कट आखला.

अर्जुन वाघने अवघ्या तीनच दिवसांत म्हणजे 30 सप्टेंबरच्या रात्री रुम साफ केली. गोरखनाथन मोठ्या हुशारीने चोरी केली. दोघे गणपती पाहायला गेले, मात्र तो अमितला चकवा देऊन रुमवर गेला आणि रुमवरील लॅपटॉप, कॅमेरा, स्पिाकर चोरले. अमितला त्याच्यावर संशय देखील आला नाही. मात्र प्रत्येक गुन्हेगार काही ना काही पुरावा मागे सोडतोच आणि गोरखनाथनेही तिच चूक केली.

11 दिवसांनी गोरखनाथला पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमालही जप्त केला. पोलिसांनी झडती घेतली असता त्याने 25 हजारांचा कॅनन कंपनीचा डीजिटल कॅमेरा, 12 हजारांचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, इन्टेक्स कंपनीचे स्पीकर आणि निळ्या रंगाची बॅग असा एकूण 37 हजारांचा ऐवज चोरल्याचे निष्पन्न झालं.

अमित सिंहने जी चूक केली ती तुम्ही करु नका. सोशल मीडियामुळे संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अन्यथा त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *