मुंबई लोकल काही आठवड्यांपूर्वी दोनदा स्थानक चुकवत पुढे निघून गेल्याची घटना ताजी असतानाच कसारा येथून आलेली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक सहाऐवजी नऊवर आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मात्र, ही व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वयनाशी संबंधित असून पूर्वनियोजित नियोजनाचा भाग होती, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले आहे.
‘सीएसएमटी’मधील फलाट क्र.एक ते सात उपनगरी रेल्वेसाठी राखीव आहेत. फलाट क्र. आठ ते १८ वरून लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसची हाताळणी केली जाते. फलाट नऊवर लोकल आल्याने चर्चा सुरू झाल्या. हीच लोकल दु. १२.४४ वा. ‘सीएसएमटी-टिटवाळा’ जलद लोकल म्हणून सुटणार असल्याने प्रवासी फलाट क्रमांक सहावर प्रतीक्षा करत होते. मात्र लोकल फलाट क्र. नऊवर आल्याने प्रवासी सामानासह धावत फलाट बदलत होते.
कसाऱ्याहून सीएसएमटीला येणारी लोकल फलाट क्र. नऊवर घेण्यात आली. यामध्ये सुरक्षेला धोका पोहोचला नाही. प्रवाशांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार टिटवाळ्याकडे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकावर आवश्यक मदत आणि मार्गदर्शन करण्यात आले. सर्व प्रवासी गाडीत चढल्यानंतरच प्रवास सुरू करण्यात आला, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
‘लोकल खोळंबा’ टळणार
ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाल्याने पावसात रुळांवर पाणी साचणार नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने होणारा लोकल खोळंबा कमी होणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. तर ठाणे स्थानकात मुलुंड दिशेला नव्या पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा केला. यावेळी विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच ठाणे पूर्व येथील ‘सॅटिस’ पुलावरून टीएमटीची वाहतूक सुरू करण्याच्या दिशेनेही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
ठाणे रेल्वे स्थानकातील नवीन सार्वजनिक शौचालय, एस्केलेटरच्या कामाला गती देणे, फलाटांवर मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, वैद्यकीय कक्ष कार्यान्वयित करणे, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करणे, या विविध विकासकामांना गती देण्यासाठी तसेच ठाणे रेल्वे स्थानकावरील विविध प्रलंबित प्रश्न, रखडलेली कामे आणि प्रवाशांच्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी मध्य रेल्वे प्रशासनाचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी सीएसआर फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील सरकत्या जिन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्यालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्याची सूचना खासदारांनी केली. लवकरच ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने फलाटांची लांबी वाढवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. ‘बी केबिन’ परिसरातील रहिवाशांच्या घरांना निष्कासनाची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. यामुळे स्थानिक नागरिक बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.
