गेले २६ पावसाळे भाक्रा कालव्याच्या पाण्याने एक भयानक गुपित दडवून ठेवलं होतं; तर दुसरीकडे पंजाबमधील रुपनगर येथील तीन कुटुंबं दु:ख आणि आशेच्या द्वंद्वात अडकली होती. परंतु रविवारी कालव्याच्या खोल गर्भातून पूर्णपणे गंजलेली आणि अक्षरशः खिळखिळी झालेली एक ‘मारुती ओम्नी’ गाडी वर ओढून काढण्यात आली. त्या गाडीत अजूनही एका लहान मुलाचा शाळेचा गणवेश, काही सामान, वैयक्तिक वस्तू आणि मानवी हाडे — म्हणजेच बेपत्ता झालेल्या चौघा व्यक्तींचे अवशेष आढळून आले.
२६ वर्षांपूर्वीची काळरात्र
अखेरीस, त्या कुटुंबांच्या भावनावेगाला पूर्णत्व मिळालं आहे. खरं तर तिन्ही कुटुंबांनी आपल्या प्रियजनांचा शोध घेणं कधीच सोडलं नाही, मग त्या शोधापायी त्यांना जवळजवळ कंगाल होण्याची वेळ आली असली तरीही. मुन्नी लाल, तेज राम, सुरजित सिंग आणि सुरजितचा ८ वर्षांचा मुलगा कालू यांना दुर्दैवी अपघातात मृत्यू आल्याचं स्पष्ट झालं. चौघांचे जे फोटो त्यांच्या आठवणीत घरांच्या भिंतींवर टांगलेले होते, त्या फोटोंना आता हार घालण्यात आले आहेत. आता त्यांचे नातेवाईक त्यांना अखेरचा निरोप देऊ शकतात.
शोध लागतच नव्हता
१७ ऑक्टोबर २००० रोजी, तेज राम याने अवघ्या एका महिन्यापूर्वीच खरेदी केलेल्या ‘ओम्नी’ गाडीने चौघे जण एका लग्नाहून परतत होते. मात्र ते कधीच घरी पोहोचले नाहीत. कोटला गावातील (चंदिगढपासून ८० किमी अंतरावर) त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा आटोकाट शोध घेतला. कालव्याचा तळ पिंजून काढण्यासाठी त्यांनी पाणबुडे नेमले, हा शोध अविरत चालू ठेवण्यासाठी त्यांनी आपली जमीनही विकली; पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेरीस हे प्रकरण थंड पडले.
३२ फूट खोल गंजलेली व्हॅन
जेव्हा स्थानिक पाणबुडे कमलप्रीत सैनी यांनी बेपत्ता असलेल्या अन्य एका व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्या जीवघेण्या प्रवाहांत उडी घेतली, तेव्हा या तपासात एक महत्त्वाचे यश हाती आले. त्यांना कालव्याच्या तळाशी ३२ फूट खोलीवर गंजून गेलेली एक व्हॅन आढळून आली. जवळपास तीन तास चाललेल्या मोहिमेनंतर ते वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले.
मुन्नी लाल यांची पत्नी सीता देवी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं की, या दुर्दैवी घटनेने त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. “लेकाच्या विरहाने व्याकुळ होऊन मुन्नी लाल यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. तसेच पुराव्यांच्या अभावामुळे आम्हाला त्यांचे मृत्यू प्रमाणपत्रही मिळवता येत नव्हते”
मुलाचा शाळेचा गणवेश
सैनी यांच्या मते, व्हॅनचा मागील भाग आणि तिचं छप्पर मोठ्या प्रमाणात निकामी झालं होतं; कदाचित जोरदार आघात, तसेच पाण्याचा तीव्र प्रवाह आणि दाब यांचा दीर्घकाळ सामना करावा लागल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असावी. घटनास्थळावरून काही मानवी अस्थी, कपडे, बूट आणि त्या मुलाचा शाळेचा गणवेश हस्तगत करण्यात आला.
कर्जाचा वाढता बोजा असह्य झाल्यामुळे, बेपत्ता होण्याची घटना घडल्यानंतर पाच वर्षांनी त्या कुटुंबाला आपले दुग्धविक्रीचे दुकान विकावे लागले. आपल्या पतीच्या फोटोकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, “त्यांना अंतिम निरोप दिल्यानंतर मी त्यांच्या प्रतिमेला हार घातला.”
जमीन विकून घेतलेली गाडी
तेज राम यांचा मुलगा भूपिंदर त्यावेळी पाच वर्षांचा होता, त्याने त्यांच्या हालअपेष्टांची आठवण सांगितली. “मला सांगण्यात आलं होतं की, ओम्नी गाडी विकत घेण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यावेळी ३ कनाल (सुमारे १६,३३५ चौरस फूट) जमीन विकली होती. त्यानंतर शोध मोहिमांचा खर्च भागवण्यासाठी आम्ही आणखी ५ कनाल (२७,२२५ चौरस फूट) जमीन विकली.”
अधिकृत यंत्रणांनी राबवलेल्या शोध मोहिमा निष्फळ ठरल्यानंतर, खाजगी पाणबुड्यांची मदत घेण्यासाठी या कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढलं”अनेक अडचणी असूनही, माझा भाऊ आणि मी कसाबसा बारावीपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला” असं भूपिंदरने सांगितलं.
कुटुंबानेच व्हॅन बाहेर काढली
सैनी म्हणाले की, वाहनाच्या अवशेषांना केवळ साखळ्या आणि केबल्स जोडणं हे अत्यंत धोकादायक काम होतं. परंतु, यामुळे त्या कुटुंबांना एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळाला, असं ते म्हणाले. किरतपूर साहिबचे एस. एच. ओ. इन्स्पेक्टर राहुल शर्मा यांनी सांगितलं की, स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने या कुटुंबांनी ती व्हॅन स्वतःच बाहेर काढली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
बॉडीच्या कपड्यांमध्ये सापडलेले हाडांचे काही तुकडे धार्मिक विधींनुसार विसर्जित करण्यात आले. या कुटुंबांनी रुपनगर येथील गुरुद्वारा पातालपुरी साहिब येथे सामूहिक ‘अरदास’ (प्रार्थना) केली.
