वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला? आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपवलं, पुण्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ

पुणे शहरात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्यांनी धुमाकूळ घातला असून आंदेकर-कोमकर टोळीयुद्धाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला अद्यापही सुरू असल्याची चर्चा असतानाच, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आकाश मस्के याचा भाऊ बाळा मस्के याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पुण्यातील बालाजीनगर बसस्टॉपजवळ काही हल्लेखोरांनी भरदिवसा आधी बाळा मस्केवर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याला संपवलं. भर रस्त्यात झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. प्राथमिक तपासात हा खून जुन्या टोळीयुद्धातून आणि सूडाच्या भावनेतून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आंदेकर आणि कोमकर टोळीयुद्ध

आंदेकर आणि कोमकर गटातील संघर्ष मागील काही वर्षांपासून पुणे शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या झाली होती. आयुष कोमकरच्या हत्येनंतर आता बाळा मस्केच्या खुनामुळे हे टोळीयुद्ध पुन्हा एकदा पेटल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून नेमके काय प्रयत्न केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *