‘गुरु’ कुलकर्णीने 132 प्रश्न सांगितले, मोटेगावकरने लिहून घेतले, मोबाईलमध्ये PDF सेव्ह; पुण्यातील क्लास चालकांवरही संशयाची सुई

‘नीट’ परीक्षेतील रसायनशास्त्राच्या पेपरचे मराठीत भाषांतर करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णीने १३५ पैकी १३२ प्रश्न ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’चा संचालक शिवराज मोटेगावकर याला दिल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात निष्पन्न झाले आहे. कुलकर्णी याच्याकडे रसायनशास्त्राच्या ४५ प्रश्नांच्या चारपैकी तीन संचांचे भाषांतर करण्याची जबाबदारी होती. या तीन संचांतील १३२ प्रश्न फोडण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

लातूर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मोटेगावकरकडे रसायनशास्त्राचे १३२ प्रश्नांची ‘पीडीएफ’ असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, हे प्रश्न मोटेगावकरकडे कसे आले, याचा खुलासा ‘सीबीआय’च्या चौकशीत उघडकीस आला आहे.

कुलकर्णी हा मोटेगावकरचा शिक्षक असून, दोघांमध्ये पूर्वीपासून जवळचे संबंध होते. कुलकर्णी याच्याकडे प्रश्नपत्रिकेचे भाषांतर करण्याची जबाबदारी आल्यानंतर त्याने ते प्रश्न मोटेगावकरला सांगितल्याचा प्राथमिक कयास आहे. कुलकर्णीने सांगितलेले प्रश्न मोटेगावकरने लिहून घेतले आणि त्याची ‘पीडीएफ’ मोबाइल फोनमध्ये ‘सेव्ह’ केली. हीच ‘पीडीएफ’ लातूर पोलिस आणि ‘सीबीआय’च्या हाती लागल्यानंतर रसासनशास्त्राचे प्रश्न फुटल्याचे स्पष्ट झाले.

कुलकर्णीकडे भाषांतराची जबाबदारी

परीक्षेसाठी रसायनशास्त्राच्या पेपरचे चार संच तयार करण्यात येतात. या चारही संचांचे इंग्रजीतून स्थानिक भाषेत भाषांतर करण्यात येते. कुलकर्णी याच्याकडे तीन संचांच्या भाषांतराची जबाबदारी होती. त्यामुळे त्याला केवळ १३५ प्रश्नांची माहिती होती, त्यापैकी १३२ प्रश्न शिवराज मोटेगावकरला देण्यात आले होते. या चार संचांपैकी दोहोंची प्रिंट काढण्यात येते, तर अन्य दोन संच राखून ठेवण्यात येतात. अशाच प्रकारे यापूर्वीही ‘नीट’चे पेपर फुटले असावेत, असा संशय असून त्या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे.

महाराष्ट्र ते उत्तर भारत, फुटीची साखळी

या प्रकरणातील इतर दोन मुख्य आरोपी मांढरे आणि वाघमारे एकाच इमारतीत राहणाऱ्या आहेत. वाघमारे विद्यार्थी गोळा करून मांढरेकडे शिकवणीला पाठवत असे. तिथे जीवशास्त्राचे प्रश्न फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले. वाघमारेच्या संपर्कातील अहिल्यानगर येथील धनंजय लोखंडेने नाशिक येथील शुभम खैरनार याला ते प्रश्न पाठवले. खैरनार याने ‘टेलिग्राम’च्या साह्याने हे प्रश्न गुरुग्राम येथील यश यादवला पाठवले. यादवने ते राजस्थानातील मांगिलाल खाटिकला पाठवल्याचे सध्याच्या तपासावरून दिसते. यादवला ‘टेलिग्राम’वरून १५० प्रश्न आणि त्याची उत्तरे पाठवण्यात आल्याने या ‘पेपर लीक’चा उत्तर भारतातील प्रवास सुरू झाला होता.

पुण्यातील क्लास संचालकांवर संशयाची सुई

लातूर आणि राज्यस्थान पोलिसांनी केलेल्या स्वतंत्र तपासाचे धागेदोरे पुण्यात पोहोचले. पुण्यातील अनेक क्लास संचालक; तसेच शिक्षकांवर संशयाची सुई आहे. ‘सीबीआय’कडून त्यातील अनेकांची कसून चौकशी सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. ‘सीबीआय’कडून मांढरे, कुलकर्णी; तसेच वाघमारे यांच्या संपर्कातील क्लासचालक, शिक्षक, नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी, त्यांचे पालक यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.

मांढरे आणि कुलकर्णी यांनी किती विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली, या विद्यार्थ्यांना नेमके त्यावेळी काय सांगण्यात आले, पालकांकडून रक्कम उकळण्यात आली का, याची चौकशी सुरू झाल्याने शहरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *