19 वर्षीय विवाहित सुनेचा मृत्यू, सासऱ्याने वेगळाच बनाव रचला; दफन केलेली बॉडी उकरून बाहेर काढताच भांडाफोड!

अमरावती येथील सौदागरपुरा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 19 वर्षीय फाजीला जबील मोहम्मद जुबेर हिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. विवाहानंतर फाजीला जबील मोहम्मद जुबेर ही नागपूर येथील गोरियानगर, मोमीनपुरा येथे आपल्या सासरी वास्तव्यास होती. मात्र सासरच्या लोकांकडून सतत त्रास होत असल्याची माहिती सदर विवाहितेने वारंवार वडील आणि भावाला फोन करून दिली होती. तसंच 15 मे रोजी “अब्बू मला लवकर अमरावती घेऊन जा,” असा फाजीला हिचा शेवटचा फोनही माहेरच्या लोकांना आला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच तिचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सासरच्या व्यक्तींकडून फाजीला हिच्या माहेरच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच आई-वडील नागपूरला पोहोचले असता फाजीला हिचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला व तत्काळ दफनविधी करण्याची विनंती सासरच्या व्यक्तींकडून करण्यात आली. मात्र मृतदेह अमरावतीत आणल्यानंतर आंघोळ घालताना गळ्यावर व्रण दिसून आल्यामुळे या संपूर्ण घटनेविषयीचा संशय अधिक बळावला. यानंतर शेकडो नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशन इथं धाव घेत कारवाईची मागणी केली.

17 मे रोजी नायब तहसीलदार टीना चव्हाण आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कब्र उकरून फाजीलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. प्राथमिक अहवालात गळा आवळणे किंवा श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.

कुटुंबातील व्यक्तींनीच केला घात?

फाजीला हिच्या दिराची पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी गेली होती. त्यानंतर दीर फाजीला हिच्यावर वाईट नजर ठेवत होता अशी माहिती तिने आपल्या भावाला फोनवर सांगितल्याची भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन नागपूर येथे मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पती मोहमद जुबेर , दीर मोहमद इरफान मोहमद जलील व सासरा मोहमद जलील उर्फ संजू पटेल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *