अर्ध्याहून अधिक देशात उष्णतेची लाट जाणवत असून, उष्ण वारे अधिकच त्रासदायक ठरत आहेत. महाराष्ट्रावरही या हवामान स्थितीचा परिणाम दिसून येतोय. त्यातच आता मान्सून राज्यात कधी दाखल होणार, या प्रश्नाला सातत्यानं वाव मिळताना दिसत आहे. आयएमडीच्या निरीक्षणानुसार एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाकिस्तान आणि जम्मू भागावर तयार होत असून, त्यामागोमागच पश्चिमी झंझावातसदृश्य स्थितीसुद्धा आहे, ज्याचे कमीजास्त परिणाम देशातील हवामानावर होताना दिसत आहेत. तिथं दक्षिणेकडे केरळात सागरी क्षेत्रावर पावसाळी ढगांचं अच्छादन पाहायला मिळत असून, अधिकृतपणे मान्सूनसाठी ज्या पद्धतीच्या ढगांची निर्मिती होणं गरजेचं आहे, तसे ढग तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या प्रवासात पुढं काही अडथळेसुद्धा आहेत.
मान्सूनचं वेळापत्रक गडबडलं?
हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सूनची गाडी वेगानं पुढे सरकत असून आता तो श्रीलंकेपर्यंत दाखल झाला आहे. मात्र त्याच्यावर एल निनोचं सावट असल्यामुळं उष्णता या मान्सूनचा प्रभाव कमी करताना दिसतेय. तरीसुद्धा मान्सून केरळात 26 मे च्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवस मागेपुढेसुद्धा होऊ शकतात. केरळानंतर गोवा, तळकोकण आणि त्यानंतर मुंबईकरांच्या दाराशी मान्सून हजर असेल.
या काळात दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, माहे इथं होणारा पाऊस हा मान्सूनपूर्व सरींच्या रुपात हजेरी लावेल, तर, कर्नाटकासह रायलसीमा भागातही कमी दाबाचा पट्टा सागरी क्षेत्रात सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार मोसमी वारे अरबी समुद्राच्या आग्नेयेला अरबी समुद्राचा मोठा भाग, कन्याकुमारीचं सागरी क्षेत्र आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडील भाग व्यापत असून, तिथं तळ ठोकण्याच्या तयारीत दिसत आहेत.
2026 या वर्षाचा 2002 शी काय संबंध?
मान्सूनच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच असताना स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मान्सूनची तुलना 2002 या वर्षाशी होत आहे. हे तेच वर्ष आहे जेव्हा मान्सूनची सरासरी 81 टक्के इतकी नोंदवण्यात आली होती. यंदाचं पर्जन्यमान तितकं कमी नसलं तरीही मान्सूनची प्रगती मात्र धीम्या गतीनं होताना दिसेल. 79 दिवसांमध्ये मोसमी वारे भारतभर व्याप्ती करत तेव्हा खऱ्या अर्थानं मान्सूननं देश व्यापला असं म्हणावं लागेल.
जूनमध्ये कसं असेल पर्जन्यमान?
स्कायमेटच्या अंदाजानुसार जूनमध्ये मान्सूनचं प्रमाण सामान्य असेल. मात्र, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्यात तुलनेनं घट होऊ शकते. त्यामुळं आता प्रत्यक्षात डेरेदाखल झाल्यानंतर हा पाऊस किती प्रमाणात बरसतो याकडे तज्ज्ञांचंही लक्ष लागलेलं असेल हेच खरं.
