नई चौघड्यांचे सूर, मंगलाष्टकाचे स्वर, डीजेचा दणदणाट आणि आनंदानं उपस्थित असलेले वऱ्हाडी पाहुणे अशा मंगलमय वातावरणात मुलीचा विवाह सोहळा पार पडला. मात्र, बिदाई करण्यापूर्वी कन्यादानावेळी वधू पित्याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं लग्नाचा आनंद क्षणात दुःखात परिवर्तित झाला. नववधू आणि वरासह उपस्थित सर्वांवर शोककळा पसरली. बुलढाणा जिल्ह्यातील वरदडी बुद्रुक येथे मंगळवारी 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कुरुमदास पुंडलिक भुतेकर (वय 50) असं या वधू पित्याचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
भुतेकर यांची कन्या नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आर्डा (तोलाजी) येथील रहिवासी प्रदीप महादेव नानोटे यांच्याशी निश्चित झाला होता. आपल्या लाडक्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा आणि विवाहसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी भुतेकर गेल्या अनेक दिवसांपासून धावपळ करीत होते. त्यांनी स्वतः घरोघरी आणि नात्यागोत्यात जाऊन प्रत्येकाला लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. लग्नाच्या दिवशी मंगळवारी 12 मे रोजी दुपारपर्यंत लग्न घरात प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं. दोन्ही बाजूचे पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळी उपस्थितीत हा विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला.
दुपारचे मुख्य विधी आणि लग्न लागल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारात वधूची पाठवणी करण्यापूर्वीचा अत्यंत भाऊक आणि महत्त्वाचा असणारा कन्यादान विधी सुरू झाला. सर्व नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळी समोर बसली होती. भुतेकर हे धार्मिक विधीनुसार आपली मुलगी नंदिनी हिचे कन्यादान करत असतानाच अचानक भुतेकर यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते बसल्याबसल्या जागीच कोसळले. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं उपस्थितांना लक्षात आलं आणि यानंतर संपूर्ण लग्न मंडपात शोककळा पसरली.
चार महिन्यांपूर्वी झाली बायपास शस्त्रक्रिया
कुरूमदास भुतेकर यांच्या आईचे 26 डिसेंबर रोजी निधन झाले. त्याच महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुलगा विशालचा विवाह 21 एप्रिल रोजी पार पडला. एकवीस दिवसांच्या अंतराने मुलीचा विवाह लावण्यात आला.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुरुमदास भुतेकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात काल गुरुवार रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.
