राज्यात उन्हाचा कहर, घराबाहेर पडणं झालं कठीण; रात्रीही अंगाची लाहीलाही, अकोला-अमरावतीत ४६ अंशांचा धोका

काही दिवसांच्या दिलाश्यानंतर विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेचा कहर वाढू लागला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान झपाट्याने वाढत आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि गार वाऱ्यांमुळे गेल्या आठवड्यात नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र आता आकाश निरभ्र होताच उन्हाचा तडाखा पुन्हा तीव्र झाला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असून, उष्णतेमुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे.

उष्णतेची लाट अधिक तीव्र?

प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत विदर्भातील बहुतांश भागात तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये ही वाढ ३ ते ४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सध्या कुठे किती तापमान?

सध्या विदर्भातील अनेक शहरांचे तापमान चाळिशी पार गेले आहे. अकोल्यात सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अमरावतीत ४४ अंश तर वर्ध्यात ४३.८ अंश तापमान नोंदवले गेले आहे. नागपूरचाही पारा वाढून ४२ अंशांवर पोहोचला आहे. तर गोंदिया येथे तुलनेने कमी म्हणजे ३९.२ अंश तापमानाची नोंद झाली असली तरी उकाड्याची तीव्रता कायम आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भातील वर्धा तसेच पश्चिम विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

उन्हाचा तडाखा वाढण्याचे कारण काय?

प्रादेशिक हवामान केंद्राचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अंदमान समुद्र आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे तापमान नियंत्रणात होते. मात्र आता त्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. याशिवाय गुजरात आणि राजस्थान भागात तयार झालेल्या चक्रवाती प्रणालीचाही परिणाम विदर्भाच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे कोरडे आणि उष्ण वारे विदर्भात पोहोचत असून तापमान सातत्याने वाढत आहे. नागपूर शहरातही सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर उष्ण वाऱ्यांचे लोट जाणवत असून, नागरिक हैराण झाले आहेत.

हवामान विभागाचे सतर्कतेचे आवाहन

दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उन्हात दीर्घकाळ काम टाळण्याचे आवाहन केले आहे. आगामी आठवडाभर विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *