बेळगाव ते ठाणे’ चोरीच्या गाड्यांचे थरारनाट्य! ठाण्यात वाहतूक पोलिसांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग

 कर्नाटकच्या सीमाभागातील बेळगाव येथून चोरलेल्या दोन चारचाकी गाड्या ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने हस्तगत करण्यात आल्या. या गाड्या ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येताच वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत फिल्मी स्टाईलने वाहनांचा पाठलाग केला. त्यामुळे पाचावर धारण बसलेल्या चोरटयांनी ही वाहने रस्त्यात सोडून धूम ठोकली. यातील एका वाहनाचा वाहतूक पोलिसाने तब्बल आठ किलोमीटर दुचाकीवरून थरारक माग काढला. दरम्यान, ही वाहने बेळगाव पोलिस आणि मूळ मालकांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी ठाणे पोलिसांचे या कामगिरीबाबत विशेष आभार मानले.

बेळगाव येथून चोरटयांनी ९ एप्रिल रोजी दोन चारचाकी गाड्यांच्या काच फोडून पळ काढला. या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित असल्याने वाहन मालकांनी गाड्यांचा माग काढला. १० एप्रिल रोजी ही वाहने लोणावळा ओलांडून पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती स्थानिक पोलिसांनी ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिली. शिरसाट यांनी तातडीने ठाणे वाहतूक पोलिसांना सतर्कतेचे निर्देश दिले. त्याचवेळी ही वाहने साकेत येथून माजिवडा चौकाकडे येत असल्याचे निदर्शनास येताच कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी येथील वाहतूक पोलिसांना ही माहिती कळवली.

माजिवडा चौकात कारवाईसाठी उभ्या वाहतूक पोलिसांना या वाहनांमधील एक चोरीची गाडी दिसून येताच त्यांनी वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरटयाने पोलिसांच्या अंगावर गाडी घालत येथून धूम ठोकली. यावेळी पोलिस हवालदार आश्रू हाके यांनी तात्काळ येथून जाणाऱ्या डिलेव्हरी बॉयला रोखून मदत मागितली. या डिलेव्हरी बॉयच्या दुचाकीवरुन हाके यांनी या गाडीचा पाठलाग केला. यावेळी अनेकदा चोरट्याने हाके यांच्या दुचाकीला धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी हाके यांनी पाठलाग सुरु ठेवला. अखेर कावेसर येथील विजय गार्डन परिसरात वाहतूक कोंडीमुळे चोरट्याने गाडीचा वेग कमी केला

भर रस्त्यात झटापट

गाडीचा वेग कमी होताच हाके यांनी दुचाकीवरून उतरून गाडीच्या मागच्या काचेवर दगड भिरकावला. काच फुटून त्याचे तुकडे चोरट्यावर पडले. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने गाडी घोडबंदर रोडवरील मुख्य मार्गिकेवर सोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर धाव घेतली. त्याचवेळी या रस्त्यावरील दुभाजक ओलांडताना हाके यांनी चोरट्यावर झडप घातली. या झटापटीत चोरट्याचे शर्टही फाटून हाके यांच्या हातात आले. मात्र चोरटा समोरील रस्त्यावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. यावेळी रस्त्यावरील नागरिकांकडे मदतीसाठी विनवणी करूनही कोणी पुढे आले नाही. अन्यथा चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले असते, अशी माहिती हवालदार हाके यांनी दिली.

पोलिसांची कुणकुण लागताच पलायन

चोरीच्या दुसऱ्या गाडीतील चोरट्यांना या थरार नाट्याची कुणकुण लागल्याने त्यांनी कळव्यातील विटावा भागात दुसरी गाडी सोडून पलायन केले. सोमवारी या दोन्ही गाड्या बेळगाव पोलिस आणि मूळ मालकांच्या ठाणे पोलिसांनी ताब्यात दिल्या असून चोरट्यांचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *