एक सरकार आपले पाच वर्षाचे कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा निवडणुका जिंकून सत्तेत येऊ शकतं. पण सर्वसामान्यांसाठी एक साधा पादचारी पूल व्हायला तब्बल सात वर्षांचा काळ स्थानबद्ध होऊ शकतो, हे आजच्या काळातलं करुण वास्तव आहे. हे वास्तव कल्याणच्या लोकग्रामच्या पादचारी रेल्वे पुलाचं आहे. हा रेल्वे पूल 2019 साली रेल्वे प्रशासानकडून पाडण्यात आला होता. या रेल्वे पादचारी पुलाच्या जागेवर नवा पादचारी पूल होईल, अशी माहिती समोर आली होती. पण या रेल्वे पादचारी पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी अजूनही सर्वसामान्य नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. विशेष म्हणजे जवळपास सहा वर्षे हा रेल्वे पादचारी पूल अदृश्य होता. रेल्वे पादचारी पूल आज होईल, उद्या होईल, अशी आशा घेऊन लाखो नागरीक दररोज रेल्वे पूल जिथे जमीनदोस्त करण्यात आला होता त्या जागेवरुन रेल्वे रुळ पार करुन पायपीट करत जात होते. आतादेखील प्रवाशांची तीच अवस्था आहे.
अधिकाऱ्यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
आम्ही स्कायवॉचे काम कधी होईल, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकग्रामचा रेल्वे पादचारी पूल बनला असला तरी अजूनही तो नागरिकांसाठी अपेक्षित असा वापरण्यायोग्य झालेला नाही. हा रेल्वे ब्रिज पुढच्या चार महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५, ६ आणि ७ ला जोडला जाणार आहे. प्लॅटफॉर्म १ ए आणि २ व ३ ला हा ब्रिज सध्या तरी जोडणं तांत्रिकृष्ट्या शक्य नसल्याचं त्या अधिकाऱ्यांकडून समजलं.
विशेष म्हणजे पूर्वीचा रेल्वे पादचारी पूल हा मधल्या मोठ्या पादचारी पुलाला जोडला गेला होता. पण हा रेल्वे पादचारी पूल त्या मोठ्या पादचारी पुलाला जोडला जाईल का? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यावर त्यांनी याबाबत आता सांगू शकत नाही. कारण जो मधला मोठा पादचारी पूल आहे त्याचे कंस्ट्रक्शन वेगळे आहे. त्यामुळे नवा रेल्वे पदचारी पूल त्याला जोडता येईल का? ते पाहावं लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनीखरंतर दोन्ही रेल्वे पादचारी पूल जोडले जाणे ही खरंतर प्रवाशांच्या सोयीसाठी खूप गरजेची आहे. कारण त्याने कनेक्टिविटी वाढणार आहे. एका पादचारी पुलावरुन प्रवाशी दुसऱ्या आणि तिसऱ्या पादचारी पुलावर जाऊ शकतील. पण सध्याच्या लोकग्रामच्या पादचारी पुलाच्या कामाची गती पाहता तशी आशा प्रवाशांनी बाळगावा का? असा प्रश्न आहे.
