जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरून बँकेच्या कामासाठी निघालेल्या एका ४६ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना गवळीशिवरा-आरापूर शिवारात मंगळवारी उघडकीस आली. या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
सुमन कडू काकडे (वय ४६, रा. वडाळी, ह.मु. गवळी धानोरा, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुमन काकडे या त्यांच्या माहेरी गवळी धानोरा येथे भावाकडे राहत होत्या. सकाळी त्या आपल्या बँकेचे केवायसी अपडेट करण्यासाठी लासूर स्टेशनला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी दुपारी गवळीशिवरा शिवारातील गट क्रमांक ८९ मध्ये एक शेतकरी आपले शेत नांगरण्याचे काम करत होता. यावेळी त्याला रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने तातडीने पोलीस पाटलांना माहिती दिली आणि त्यानंतर शिल्येगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
