पश्चिम बंगालमध्ये काही केल्या हिंसाचार कमी होताना दिसत नाही. पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर इथे वारंवार हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री इथे हिंसाचाराच्या घटनेने टोक गाठलं आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय्य सहायक चंद्रनाथ रथ यांची बंगालमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर आणखी एक हल्ल्याची घटना समोर आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञात आरोपींकडून बॉम्ब हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भाजपचे 5 कार्यकर्ते जखमी आहेत.
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात पानीहाटी परिसरात भाजप कार्यकर्त्यांवर देशी बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. भाजप नेता सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय्य सहायक चंद्रनाथ रथ यांची अज्ञात आरोपींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता भाजप कार्यकर्त्यांवरील बॉम्ब हल्ल्याची घटना समोर आली आहे. चंद्रनाथ रथ यांच्यावरील हल्ल्यानंतर काही तासांतच भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही रात्री पानीहाटी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये दत्ता रोड परिसरात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
काही भाजप कार्यकर्ते सर्वसामान्यांसोबत बातचित करत होते. यावेळी अचानक दुचाकीवरुन चार जण आले. त्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्ब हल्ला केला. अज्ञात आरोपींकडून भाजप कार्यकर्त्यांवर तीन बॉम्ब फेकण्यात आले. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. या हल्ल्यात भाजपचे पाच कार्यकर्ते जखमी झाले.
सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यात गेल्या 15 वर्षांपासून बदल्याची राजकारण सुरु आहे. गेल्या 15 वर्षांच्या महाजंगलराजचा हा परिणाम आहे. गेल्या रात्री खडदहा इथे बॉम्बस्फोट झाला. बसीरबाट येथे भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. या हिंसाचारात जबाबदार राहणाऱ्यांना सोडलं जाणार नाही”, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत.
पानीहाटी येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यामागे टीएमसीचा हात असल्याचा आरोप भाजपने केले आहे. पानीहाटी हे मध्यग्राम येथून जवळपास 7 किमी दूर आहे, जिथे सुवेंदू अधिकारी यांच्या खासगी पीएची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
