लोकल मार्गावर मृत्यूची मालिका

लोकल मार्गावर मृत्यूची मालिका

‘रेल्वे रूळ ओलांडू नका, त्यामुळे जीवाला धोका आहे’ अशा उद्घोषणा मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये केल्या जातात. तरी शनिवारी दिवसभरात लोकलच्या मार्गात तब्बल १५ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने रेल्वेच्या आवाहनाला प्रवासी केराची टोपली दाखवत असल्याचे उघड झाले आहे.

मात्र, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शनिवारी झालेल्या अपघातांमध्ये ठाणे, कल्याण आणि बोरिवली रेल्वे पोलीस स्थानकांच्या हद्दीत ३ जणांचा मृत्यू झाला. कुर्ला आणि पालघर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत प्रत्येकी दोन जणांचा तर वांद्रे आणि वसई ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच संपूर्ण आठवडाभरात तब्बल ७३ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून ६९ जण जखमी झाले आहेत.

त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकलच्या मार्गावर रेल्वे रुळांलगत सुरक्षाभिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, या सुरक्षाभिंतींना मोठय़ा प्रमाणात भगदाडे पाडली जात असताना रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

त्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रवासी रेल्वे रुळ ओलांडतात. याशिवाय, होणा-या अपघातांमध्ये रेल्वे रूळ ओलांडून होणा-या अपघातांचे प्रमाण अधिक असले तरीही इतर कारणांमुळेही अपघात होतात.

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलला तुफान गर्दी असल्याने ब-याचदा प्रवासी दरवाजावर उभे राहून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. यामध्ये अनेकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे प्रवाशांसोबत रेल्वे प्रशासनही वाढत्या अपघातांना कारणीभूत असल्याचा आरोप रेल्वेतील जाणकार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *