अंकारा बॉम्बस्फोटप्रकरणी तीन अधिकारी निलंबित

अंकारा बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी अंकारातील पोलीस दल, गुप्तचर विभाग, आणि सुरक्षा विभागाच्या प्रमुखांना पदावरून दूर केल्याची माहिती तुर्कस्तानच्या गृहमंत्र्यांनी गुरुवारी दिली.

अंकारात कुर्दिश समर्थकांनी काही दिवसांपूर्वी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत झालेल्या दोन बॉम्बस्फोटात ९७ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी सरकारच जबाबदार असल्याची टीका तुर्कस्तानातील विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होण्यासाठी अंकारातील पोलीस, गुप्तचर आणि सुरक्षा विभागाच्या प्रमुखांना पदावरून हटवण्यात आल्याचे गृहमत्र्यांकडून सांगण्यात आले.

गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे अंकारातील रॅलीत हा हल्ला झाल्याचे वक्तव्य तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी बुधवारी केले होते. त्यानंतर सरकारने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मंगळवारी तुर्कस्तानातील विविध पक्ष आणि संघटनांनी मोर्चा काढून या हल्ल्याचा निषेध केला. अनेक ठिकाणी रेल रोको करण्यात आले. काही ठिकाणी सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नव्हती त्यामुळे आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *