जमिनी जाणार, खात्यावर 2 कोटी रुपये येणार; एकरी भाव किती? पुरंदर विमानतळ भूसंपादनास सुरूवात, पाहा कशी असेल प्रक्रिया

पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाला आता वेग मिळाला असून, नुकतीच या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 5 मे 2026 अर्थात या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सुमारे साडेचारशे एकर जमिनीचे करारनामे करण्यात आले. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर भूसंपादनाचं काम सुरू करण्यात आलं. जिल्हा प्रशासनानं याबाबतची माहिती दिली. या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावातील 3 हजार एकर जागेची अंतिम निश्चिती करण्यात आली आहे.

भूसंपादनाच्या बदल्यात जमीन मालकांना किती रुपयांचा परतावा मिळणार? 

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या संदर्भात सविस्तर माहिती देणारी एक पत्रकार परिषद नुकतीच घेण्यात आली. ज्यामध्ये प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या जाणाऱ्या भूखंडांचा मोबदला नेमका किती दरानं देण्यात येईल याबाबतचा आकडासुद्धा सांगण्यात आला. अधिकृत माहितीनुसार सरकारनं हे दर निश्चित केले असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं.

 

हेसुद्धा वाचा : ₹180,000,000,000 ची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक अवघ्या 32 वर्षांचा; त्याचा ब्रॅण्ड तुम्हाला ठाऊक असेलच

शासनाच्या हवाल्यानं जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी दर एकर जमिनीसाठी 1 कोटी 61 लाख 1 हजार 925 रुपये इतकी किंमत मोजली जाणार आहे. ज्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी जातील त्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीसुद्धा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या 10 टक्के जमीन विकसित भूखंडाच्या स्वरुपात शेतकऱ्यांनाच परतही केला जाणार आहे ज्यामुळं हा परतावा 2 कोटींच्या घरात पोहोचणार आहे.

कोणत्या गावांतील जमिनी विमानतळासाठी जाणार? 

गाव  जमिनीचं क्षेत्रफळ
उदाचीवाडी 58.34 हे.आर
वनपुरी 154.06 हे.आर
कुंभारवळण 245.48 हे.आर
खानवडी 269.22 हे.आर
मुंजवडी 82.56 हे.आर
पारगाव 188.07 हे.आर

काय आहेत जमीन अधिग्रहणाचे मोबदला दर?

  • प्रति हेक्टर मूळ दर: ₹94,94,060
  • गुणांकानंतर दर: ₹1,89,88,120
  • 100% दिलासा: ₹1,89,88,120
  • एकूण मोबदला (प्रति हेक्टर): ₹3,79,76,240
  • प्रति एकर मोबदला: ₹1,51,90,496
  • 12% अतिरिक्त रक्कम: ₹9,11,429
  • एकूण प्रति एकर ₹1,61,01,925 प्रति आणि इतर मोबदला

फक्त जमीन नव्हे तर, इतर घटकांसाठी स्वतंत्र मोबदला निश्चित करण्यात आला आहे. ज्याचे दर खालीलप्रमाणे 

घटक  मोबदला दर 
आंबा ₹50,000 – ₹60,000
सिताफळ ₹11,000 – ₹13,000
अंजीर ₹10,000 – ₹13,000
नारळ ₹4,000 – ₹6,000
चिंच ₹40,000 – ₹50,000
चिकू ₹13,000 – ₹17,000
बाभूळ ₹4,899
कडूलिंब ₹6,392
बोर ₹2,044
निलगिरी ₹11,783
पिंपळ / वड / करंज ₹21,979
विहीर ₹3 ते ₹17 लाख
बोअरवेल ₹40,000 – ₹60,000
पक्के घर ₹3 लाख ते ₹40 लाख क्षेत्रफळानुसार ( 5700 प्रति चौरस मीटर)

लक्षात घ्या…

महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्यांना नमूद सर्व घटकांच्या मूल्यावर 100% दिलासा देऊन दुप्पट मोबदला देण्याची हमी देण्यात आली आहे. 7 मे पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर या व्यवहाराचे पैसे येण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. करारनामा होईल त्याच दिवशी आरटीजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील आणि ही संपूर्ण प्रक्रिया 10 जूनपर्यंत सुरू राहिल असं सांगण्यात आलं आहे. या तारखेनंतरची भूसंपादन प्रक्रिया ही सक्तीनं राबवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सर्वांना एकसमान मोबदला

जमीन अधिग्रहणासाठीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन येणं आवश्यक असून, कोणीही संभ्रमात राहू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रक्रिये सर्वांना एकसमान मोबदला दिला जाईल. सदर प्रक्रियेबाबत बनावट पत्र फिरत आहेत, याबाबत पोलीस अधीक्षक यांना गुन्हे नोंद करण्यास सागितल्याचं जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

2026 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुरंदर विमानतळाचं काम सुरू होण्याची शक्यताअसून, यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याला शेअर होल्डर करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनाही फायदा झाला पाहिजे ही भूमिका डुडी यांनी मांडली. यामध्ये अडीच एकर पेक्षा कमी जागा असली पाहिजे, मूळ शेतकरी असणं अपेक्षित आहे अशा काही अटी त्यांनी सांगितल्या. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होते त्या शेतकऱ्यांनवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुरंदर विमानतळमध्ये सध्या अधिग्रहण करत असलेल्या भागात 6500 कुटुंब आहेत, यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी दिली जाणार असून, हे सर्वाधिक पॅकेज असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 3 वर्षाच्या आत विमानतळाचे काम पूर्ण होऊ शकते. पण भौगोलिक परिस्थिती पाहून काम केले जाईल यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *