तळेरान (ता. जुन्नर) येथे पाझर तलावात बुडून ११ वर्षीय जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आठवडाभरात चार मुले बुडाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रावणी साबळे आणि गणेश साबळे अशी मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. दोन्ही मुले आदिवासी प्रकल्पाच्या घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये निवासी शाळेत शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ते घरी आले होते. मुलांचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असून, त्यांना मोठ्या तीन मुली आणि धाकटी जुळी बहीण-भावंडे अशी पाच मुले होती.
मृत मुलांची मोठी बहीण कपडे धुण्यासाठी तळेरानच्या वसईवाडी पाझर तलावावर गेली होती. त्यानंतर ही दोन्ही भावंडे तिच्या पाठोपाठ तळ्यावर गेली. तळ्यातील पाण्यात उतरली असता, अंदाज न आल्याने दोघे बुडाली. हे पाहून मोठ्या बहिणीने आरडाओरडा केला. पोहता येत नसल्याने ती मदत करू शकली नाही. जवळ कोणी नसल्याने मुलांना वाचवता आले नाही.
घटनेची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थ आले; परंतु, तोपर्यंत ही दोन्ही मुले बुडाली होती. पाण्यात शोधाशोध केल्यानंतर पहिल्यांदा श्रावणीचा मृतदेह सापडला आणि काही वेळाने गणेशचा मृतदेह सापडला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
तर दुसऱ्या एका घटनेत, जागेच्या वादातून झालेल्या मारहाण आणि पत्नीच्या विनयभंगाच्या घटनेचा धक्का सहन न झाल्याने गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहीद इनामदार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आबेदा इनामदार व त्यांच्या कुटुंबीयांसह एकूण ११ जणांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सकाळी आझम कॅम्पससमोरील ट्रस्टच्या आवारात घडली. याबाबत शाहीद इनामदार यांचा मुलगा मुस्तफा इनामदार (वय ३१, रा. नाना पेठ) यांनी तक्रार नोंदवली आहे.
